ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4- भाजपाने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने मुंबई महापालिकेत नंबर 1 पक्ष ठरलेल्या शिवसेनेचा महापौर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाच्या कोअर समितीमधील विचारमंथनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारपरिषदेत भाजपा महापौर, स्थायीसमिती किंवा अऩ्य कुठल्याही समित्यांची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले.
त्यामुळे शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर मुंबईचे पुढचे महापौर आणि हेमांगी वरळीकर उपमहापौर असतील. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी भाजपाच्या या निर्णयाचे स्वागत केले. या निर्णयामुळे शिवसेनेला कोणत्याही छोटयापक्षांची मनधरणी करावी लागणार नाही. संपूर्ण सत्ता शिवसेनेची असेल.
मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष किंगमेकर ठरणार नाहीत. मातोश्रीवर आज झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विश्वनाथ महाडेश्वर हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. त्यांनी शिक्षण समितीचे चेअरमन पद भूषवले आहे. तर हेमांगी वरळीकर यांची ही नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे पद भूषवले होते.