ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - मुंबईच्या महापौरपदासह महापालिकेतील कोणत्याही समित्याची निवडणूक न लढवण्याच्या भाजपाच्या निर्णयामुळे नव्याने जन्माला येणारी राजकीय समीकरणे मोडीत निघाली आहेत. महापालिकेची संपूर्ण सत्ता शिवसेनेकडे राहणार आहे. भाजपाच्या कोअर समितीमध्ये ठरले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलेला नाही.
या निर्णयापूर्वी शुक्रवारी रात्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली होती असे वृत्त एबीपी माझा वाहिनीने दिले आहे. शिवसेनेकडून राज्यातील सरकारला पाठिंबा कायम राहणार असल्याचे आश्वासन शिवसेनेकडून मिळाल्यानंतर भाजपाने एक पाऊल मागे घेतले.
दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार केंद्रात आणि राज्यात सरकारची सूत्रे भाजपाकडे राहतील तर, मुंबईत सेनेची सत्ता राहिल. निवडणूक प्रचारात शिवसेना आणि भाजपाने परस्परांवर प्रचंड चिखलफेक केली असली तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यक्तीगत पातळीवर उत्तम संबंध आहेत. या दोन नेत्यांमधील समन्वयामुळे तडजोडीचा हा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे.