ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 20 - महापालिकेच्या निवडणूकीत किती जागा मिळतील याचा अंदाज शिवसेना लावू शकत नाही त्यामुळे ते पराभवाच्या मानसिकतेत आहेत, सतत रडीचा डाव खेळण्याची त्यांना सवय लागली आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी शिवसेनेवर केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ही पत्रकार परिषद नाही, पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले त्यासाठी बोलत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांच्यासोबत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित होते. (मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)
प्रत्येक दिवसाला भाजपा विरोधात तक्रारी करणं हा कार्यक्रम सेनेनं राबवला आहे. मुख्यमंत्र्यांवर आक्षेप घेतले ,आरोप केले. मुख्यमंत्र्यांनी आचार संहिता भंग केला नाही. मुख्यमंत्री 25 वर्षे राजकारणात आहेत, संसदीय कामकाजाचा त्य़ांना तगडा अनुभव आहे. त्यामुळे काय करतो याची जाणीव आहे. तरीही त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.उद्याच्या सामनाला मजकूर असावा म्हणून शिवसेना तक्रार करत असेल. संपादकीय मुलाखतीना पेड न्यूज ठरवण्याचा प्रयत्न आहे. हा पत्रकार आणि पत्रकारितेचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे. (पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: PMC Election 2017)
दरम्यान, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकेसाठी उद्या 21 तारखेला मतदान तर 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महानगरपालिकेचा रणसंग्राम जाहीर झाल्यानंतर मुंबईच्या जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये दुमत झाल्यानंतर राज्यभरात दोन्ही पक्षांनी वेगळं लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या प्रत्येक सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या आहेत.