मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सगळेच पक्ष रणनीती आखत आहेत. त्यात महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी लढत पाहायला मिळेल. मात्र यात भाजपाला नव्या मित्राची गरज भासत असेल तर सर्वांच्या नजरा मनसे-भाजपा(BJP-MNS) युतीवर लागल्या होत्या. अनेक दिवस भाजपा-मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या. परंतु आता याला पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी आगामी निवडणुकीत मनसेशी युती नाही असं स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजपा स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार असल्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. मनसेसोबत युती होणार नाही. हा विषय आमच्यासाठी आणि राज ठाकरेंसाठी संपला आहे. मंगळवारच्या बैठकीत यावर चर्चा झाली नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केले.
मुंबईत भाजपाचा महापौर होणार
मागील वेळी मुंबईत आमचा महापौर झाला असता परंतु अमित शाह यांच्या सांगण्यावरुन महापौर शिवसेनेला देण्यात आला. मात्र यंदा तसं होणार नाही. मुंबईत भाजपाचा महापौर बसेल. आगामी निवडणुकीत भाजपा ११७ पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका
बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक शिवसेनेला जमल नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं, काहीही बोलू नका. तुमचं हिंदुत्व काँग्रेसला देखील सांगा. उगाच हिंदुत्वाचा आव आणू नका. उद्धव ठाकरेंच्या तब्बेतीवर आम्ही कधी बोललं नाहीत, सदैव त्यांची तब्बेत ठीक राहावी हीच प्रार्थना केली आहे, मात्र त्यांनी जिथे शेतीचे नुकसान झाले आहे तिकडे जावे, काल अपघात झाला तिकडे त्यांनी जावे, यावर आम्ही बोललो होतो. आधी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करून दाखवा, जो प्रस्ताव खारीज करण्यात आला आहे असा टोला चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला लगावला.
...अन्यथा राज्यभर आंदोलन करू
टिपू सुलतान असं मैदानाला नाव देण्यावरुन जो वाद सुरु आहे. त्यात सरकार दडपशाही करत आहे. हा प्रकार थांबवा अन्यथा राज्यभर आंदोलन करु असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनाचा मी निषेध करतो, मी धमकी देत नाही. एखद्या मैदानाला टिपू सुलतान हे नाव देणं चुकीचं आहे. आम्हाला हे मान्य नाही. भाजपाचा आंदोलनाचा पाठिंबा आहे. भाजपा नगरसेवकाने बोर्ड लावले काय किंवा इतर कुणीही लावले असतील तर ते बोर्ड उखडून काढले पाहिजेत असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.