ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीचे कल हाती यायला सुरुवात झाल्यानं राजकीय नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच माझ्या पराभवासाठी काँग्रेस नेत्यांनीच प्रयत्न केल्याचं संजय निरुपम म्हणाले होते. त्याच मुद्द्यावर बोट ठेवत नारायण राणेंनी संजय निरुपमांना लक्ष्य केलं आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस तिस-या क्रमांकावर फेकले गेल्याचं चित्र निर्माण झाल्यानं काँग्रेसचे धडाडीचे नेते नारायण राणेंचीही तोफ धडाडली आहे. मुंबईत काँग्रेसच्या पराभवाला संजय निरुपम जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणेंनी केला आहे. संजय निरुपम हे जिंकण्यासाठी लढलेच नाहीत, असंही ते म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या गटांत वर्चस्वासाठी लढाई सुरू होती. त्यातच पक्षश्रेष्ठींनी संजय निरुपम यांच्या पारड्यात स्वतःचं वजन टाकलं होतं. त्यामुळे गुरुदास कामत महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरले नव्हते. त्यामुळेच काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेतेही प्रचारापासून दूर राहिले.
अखेर निवडणुकांच्या निकालांचा कल हाती यायला सुरुवात झाल्यानं काँग्रेस नेत्यांनी संजय निरुपम यांना लक्ष्य केलं आहे. तसेच शिवसेनेवर टीका करणं भाजपाला महागात पडल्याचंही नारायण राणे म्हणाले आहेत. शिवसेनेवर खालच्या शब्दात टीका करणं मुख्यमंत्र्यांना न शोभणारं होतं, अशीही टीकाही राणेंनी केली आहे.