ऑनलाइन लोकमत/ सचिन लुंगसे
मुंबई, दि.23 - महापालिका निवडणुकीत सुरुवातीच्या सत्रांत ठिकठिकाणी भगवा फडकत असतानाच दुपारपर्यंत भाजपाच्या गोटात निरुत्साह होता. दुपारनंतर मात्र भाजपाने उसळी घेत शिवसेनेच्या जवळ जाणारी आकडा गाठला आणि दादरच्या वसंत स्मृतीकडे कार्यकर्त्यांची पावले आपसूक वळली. सध्याच्या तुलनेत तब्बल तीनपट अधिक यश मिळवल्याने वसंती स्मृतीत जणू ‘भाजपोत्सव’ साजरा झाला. भाजपा नेत्या शायना एनसी आणि भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष मोहीत कंबोज यांच्यासह येथे दाखल झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत ढोलताशांचा गजरात ‘भाजपोत्सव’ साजरा केला.महापालिका निवडणुकीत टोकाची टीका झाल्याने भाजपासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम आणि सपासारखे मातब्बर पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असूनही खरे चित्र शिवसेना विरुद्ध भाजपा असेच होते. निवडणुकीची रंगत वाढत असतानाच उत्साही मतदानामुळे मुंबईतल्या मतदानाचा टक्काही वाढला. थेट ५५ टक्के एवढे मतदान झाल्याने भाजपाला फायदा होईल, असे भाकीतही वर्तवले गेले, ते खरे ठरले. प्रत्यक्षात गुरुवारी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सकाळी भाजपा पिछाडीवर होती. अगदी ३५ जागांचा आकडा बराच काळ पुढे सरकत नव्हता. भाजपा कार्यकर्ते निराश होऊ लागले होते. पक्षीय कार्यालयही ढेपाळत चालले होते. मात्र दुपारनंतर चित्र पालटू लागले. शिवसेनेची आघाडी ९४ वर पोहोचून हा आकडा पुन्हा खाली येऊ लागला आणि भाजपाच्या आशा वाढल्या. भाजपाचीही आघाडी असलेल्या जागांची संख्या ७० वर गेली, आणि भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला. ही स्थिती कायम राहिल्यानंतर शिवसेना घसरुन ८५ वर स्थिरावली तर भाजपाने ८०चा आकडा पार केला. गर्दी ओसरु लागलेली भाजपाची पक्षीय कार्यालये दुपारी तीन नंतर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने ओसंडून वाहू लागली.भाजपाचे दिग्गज पराभूतभाजपाच्या रुक्मिणी खरटमोल, सुधीर खातू, तेजस्विनी आंंबोले, मंगेश सांगळे, बबलू पांचाळ, रितू तावडे या दिग्गज उमेदवारांना आपआपल्या प्रभागात पराभव पत्कारावा लागला. महत्त्वाचे म्हणजे या लढतीकडे मुंबईकरांचे विशेष लक्ष होते. मात्र या उमेदवारांना मतदारांनी कौल नाकारल्याने येथील प्रभागात निघालेल्या विजयी उमेदवारांच्या उत्साहाने भाजपाच्या उत्साहावर काहीअंशी पाणी फेरले.