ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 23 - 'कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला' या गाण्याच्या ओळी आज मुंबईत सर्वत्र ऐकू येत आहेत. मुंबईत गल्लीबोळात, नाक्यानाक्यांवर भगवा जल्लोष सुरू आहे. शिवसेनेच्या शाखांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कारणही तसेच आहे. प्रतिष्ठेच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. 25 वर्षांनंतरही शिवसेनेच्या महापालिकेमधील वर्चस्वाला कोणात्या पक्षालाही धक्का लावता आलेला नाही. उलट मागच्या दोन निवडणुकांपेक्षा शिवसेनेला यावेळी घवघवीत यश मिळाले आहे. भाजपाने दिलेल्या आव्हानाला पुरून उरत मुंबईत शिवसेनेने 90पेक्षा अधिक जागांवर आघाडी मिळवली आहे. त्यामुळे मुंबईत बॉस शिवसेनाच असेल पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
बहुमताचा दावा करणा-या भाजपा 56 जागांवर आघाडीवर आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. पण विधानसभेत मुंबईत 15 जागा जिंकणा-या भाजपासाठी हा एक धक्का आहे. काँग्रेस 22, राष्ट्रवादी काँग्रेस 6 आणि मनसे 10 जागांवर आघाडीवर आहे. अन्य पक्षीय 7 जागा मिळाल्या आहेत.