ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत मोठया संख्येने पुरुष आणि महिला उमेदवार रिंगणात उतरलेले असताना एक तृतीयपंथीय उमेदवारही निवडणूक लढवत आहे. प्रिया पाटील ही एकमेव तृतीयपंथी उमेदवार वॉर्ड 166 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे.
मागच्या दोन आठवडयांपासून दारोदार फिरुन तिचा प्रचार सुरु आहे. भ्रष्ट पुरुष आणि महिला उमेदवारांना हद्दपार करा आणि एक संधी मला द्या असे तिने मतदारांना आवाहन केले आहे. वॉर्ड क्रमांक 166 कुर्ल्याच्या बैल बाजारमध्ये येतो. 30 वर्षाच्या प्रियाला 15 तृतीयपंथीयांचा तसेच नागरीक अधिकार मंच आणि किन्नर मा ट्रस्टचा पाठिंबा आहे.
दोघे पुरुष आणि महिला उमेदवार भ्रष्ट आहेत. त्यांनी नागरीकांचे जीणे मुश्किल केले आहे. तुम्ही मला एक संधी द्या. पुरुष आणि महिलांपेक्षा मी चांगले प्रतिनिधीत्व करुन दाखवेन असा प्रियाचा दावा आहे. निवडणूक लढवण्याचा निर्णय प्रियासाठी सोपा नव्हता. तिने आधी ओबीसीसाठी राखीव असलेल्या वॉर्ड 153 मधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण कायद्याबद्दल स्पष्टता नसल्याने तिने अखेरच्या क्षणी निर्णय बदलला.
प्रिया पाटीलबरोबर अन्य 14 उमेदवार रिंगणात असून, भ्रष्टाचार मुक्त कारभाराशिवाय महिला सुरक्षितता, बेरोजगारी या प्रश्नांना सुद्धा प्राधान्य असेल असे प्रियाने सांगितले. वसई शाळेतून तिने 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. निर्मला निकेतन कॉलेजमधून सोशल वर्कमध्ये तिने डिप्लोमा केला आहे.