ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 21 - मुंबई महापालिकेनं अर्शद वारसी याच्या बंगल्यावर हातोडा चालवला आहे. बंगल्याचा काही भाग हा अनधिकृतपणे वाढवल्याचं कारण देत महापालिकेनं ही कारवाई केली आहे. एअर इंडियाच्या कर्मचा-याकडून अभिनेता अर्शद वारसीनं हा बंगला विकत घेतल्यानंतर त्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली अवैधरीत्या बंगल्याचा काही भाग वाढवला होता. बीएमसीला ही माहिती 4 वर्षांपूर्वीच प्राप्त झाली होती. मात्र आता त्यांनी त्या बंगल्यावर हातोडा चालवला आहे. मुंबई महापालिकेनं अंधेरीमधल्या वर्सोवा परिसरातल्या शांतिनिकेतन एअर इंडिया को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील बंगला नंबर 10 वर नोटीस लावली होती. बंगल्याचा मालक अर्शद वारसीला अनधिकृतरीत्या उभारलेलं बांधकाम पाडण्याची 24 तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र अभिनेता अर्शद यानं बीएमसीला कोणताही प्रतिसाद दिला नाही.पालिकेचे अधिकारी आणि इंजिनीअर बंगल्याजवळ आले तेव्हा बंगला लॉक होता. त्याच वेळी तात्काळ कारवाई करत या बंगल्याचा काही भाग बीएमसीच्या अधिका-यांनी पाडला. अर्शद आणि त्याची पत्नी मारियाने हा बंगला 2012मध्ये एअर इंडियाच्या एका कर्मचा-याकडून विकत घेतला होता. यावर अद्यापही हर्शद वारसीची प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही.
अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर बीएमसीचा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2017 5:07 PM