लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई:बोरिवली पश्चिम गोराई येथील भिमनगर नाल्यात भरणी करून 60 ते 70 अनधिकृत पक्क्या झोपड्यां बांधणे सुरू होते .उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी आणि बोरीवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे यांच्या सूचनेनुसार बोरिवलीच्या भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा रेश्मा निवळे व नगरसेविका अंजली खेडकर यांनी नुकतेच स्ट्रिंग ऑपरेशन आणि फेसबुक लाईव्ह करून यावर प्रकाशझोत टाकला होता.
यावेळी जागेवर जाऊन पाहणी केली असता६० ते ७० झोपड्यांचे पक्के बांधकाम करून झोपडपट्टी दादा त्या झोपड्या विकत आहेत असे निदर्शनास आले अशी माहिती रेश्मा निवळे यांनी लोकमतला दिली. बोरिवलीत उभी राहते मिनी धारावी या मथळ्याखाली काल लोकमत ऑनलाइन आणि आजच्या लोकमतमध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले. राजकीय वर्तुळात आणि पालिका प्रशासन स्तरावर लोकमतचे वृत्त व्हायरल झाले आणि पालिकेची यंत्रंणा कामाला लागली.
आमदार सुनील राणे यांनी सदर बांधकाम निष्कासित करण्याची मागणी लावून धरली.आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व बोरिवली पोलिसांच्या बंदोबस्तात पालिका प्रशासनाने येथील 11 झोपड्यांवर तोडक कारवाई केली. परंतू अजूनही अनधिकृत झोपड्या येथे असून त्यावर पालिकेने कारवाई केलीच पाहिजे व संबंधित झोपडपट्टी दादांवर एम आर टीपी दाखल करावी अशी मागणी भाजपाने केली आहे.
उर्वरित झोपड्यांवर येत्या सोमवारी पून्हा कारवाई होणार असून जर कारवाई झाली नाही तर पालिकेला घेराव घालण्यात येइल असे भाजपा तर्फे सांगण्यात आले. या करवाईबद्दल गोराईकरांनी समाधान व्यक्त केले आहे. तर लोकमतने सदर वृत्त देऊन पालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांनी लोकमतचे आभार मानले आहे.