ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य दहावी बोर्ड परीक्षेच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी आलेल्या आहेत त्यातील पहिल्या बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिले नसेल तर अर्धा गुण गुण कमी करावा ,अशा आशयाच्या सूचना देऊन बोर्ड विद्यार्थ्यांचे नुकसान करित आहेत, असे प्रतिपादन मुंबई मराठी अध्यापक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर भारती यांनी केले आहे.
मराठी भाषेच्या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न हा तीन गुणांचा बहुपर्यायी प्रश्न होता तो प्रश्न ,खालील बहु पर्यायी प्रश्नचा योग्य पर्याय शोधून लिहा असा होता. दहावीच्या पाठ्यपुस्तकात देखील असाच प्रश्न विचारला आहे विद्यार्थी त्याप्रमाणेच केवळ उत्तर लिहणार ते पूर्ण वाक्यात उत्तर लिहणार नाहीत. प्रश्न जर "पर्याय शोधून वाक्य पुन्हा लिहा " असा असता तर विद्यार्थ्यांनी तसे उत्तर लिहिले असते. पण बोर्डाने तसल्या सूचना आधी दिल्या नाहीत आता मात्र उत्तर पत्रिका तपासताना मुख्य नियामक (moderator )ने मराठीच्या उत्तर पत्रिका तपासताना "बहुपर्यायी प्रश्नाचे केवळ पर्याय लिहिला असेल तर अर्धा गुण कमी करावा व पूर्ण वाक्यातील उत्तरास पूर्ण गुण द्यावा." असे पत्रक काढून पेपर तपासनीसांना धक्का दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दीड गुणांचे नुकसान होणार आहे.
मुंबई बोर्डाचे सी. एम. श्री ए . आर . सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोर्डाच्या सुचनांचे समर्थन केले आहे.