पुणे : दहावी-बारावीची परीक्षा बाहेरून देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असून, लवकरच त्याची अंमलबजावणी होणार आहे.आर्थिक, कौटुंबिक किंवा अन्य कारणामुळे नियमितपणे शाळा वा कॉलेजमध्ये जाऊन दहावी-बारावीची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षा देण्याची सुविधा राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध केली आहे. राज्यातील सुमारे दोन लाख विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेऊन दरवर्षी बाहेरून परीक्षा देतात. परंतु, अनेकदा ‘एजंट’कडून या विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली जाते. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांकडूनही या विद्यार्थ्यांना त्रास दिला जातो. काही वेळा राज्य मंडळाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा या विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क आकारले जाते. परिणामी काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. या सर्व बाबी विचारात घेऊन बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून नवीन कार्यपद्धती तयार केली जात असून, तज्ज्ञ मंडळींनी यावरील कामास सुरूवात केली आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला घराशेजारील शाळेत १७ नंबरचा अर्ज कसा भरता येईल. तसेच विद्यापीठाच्या बहि:स्थ विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयास विद्यार्थी वाटून देण्याचा विचारही शिक्षण मंडळाकडून सुरू आहे. सोमवारी याविषयी बैठक होणार आहे.
बाहेरून परीक्षा देणाऱ्यांसाठी बोर्डाची नवीन कार्यपद्धती
By admin | Published: May 18, 2015 3:39 AM