मुंबई : बारावीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याने, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची डोकेदुखी वाढली होती, पण आता दहावीच्या उत्तरपत्रिका चोरीला गेल्यामुळे मंडळातर्फे उत्तरपत्रिका तपासणी केंद्रावर नजर ठेवण्यात येणार आहे. यासाठी विशेष अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. दहिसर येथील इस्त्रा शाळेतून दहावीच्या तीन विषयांच्या तब्बल ४१६ उत्तरपत्रिका चोरीला गेल्या होत्या. पोलिसांच्या शोधमोहिमेत ३१६ उत्तरपत्रिका सापडल्या आहेत. तथापि, अन्य १०० उत्तरपत्रिकांचा शोध अजूनही सुरूच आहे. चोरीला गेलेल्या उत्तरपत्रिकांचे प्रकरण लक्षात घेऊन, मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. दहिसरमधील उत्तरपत्रिका चोरी प्रकरणात सुरक्षेबाबत योग्य खबरदारी घेतली नसल्यानेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी उत्तरपत्रिका ठेवलेल्या केंद्रावर सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांचा चमू पाहणी करणार असल्याचे मंडळाचे मुंबई विभागीय अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी सांगितले. सापडलेल्या उत्तरपत्रिकांची विशेष तपासणी वाशी कार्यालयात सुरू आहे. या उत्तरपत्रिकांमध्ये काही बदल केले आहेत का, याची तपासणी करण्यात येणार आहे. शिक्षक वाशी कार्यालयात येऊनच ही तपासणी शिक्षक करत आहेत. दहिसर प्रकरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी मंडळाकडून समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दहावी, बारावीच्या पेपर तपासणीवर आता बोर्डाचा वॉच
By admin | Published: April 22, 2017 3:13 AM