अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा परीक्षा मंडळ कुलगुरुंना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. हितसंबंध जोपासण्याकरिता विद्यापीठाच्या कायद्याची पायमल्ली केली जात आहे, असा आरोप सिनेटचे माजी सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी पत्र परिषदेतून केला आहे.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा मडंळाने कुलगुरु निर्दोष असल्याचा अहवाल पारित केला. यासंदर्भात दिनेश सूर्यवंशी यांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यांनी आरोपात म्हटले की, परीक्षा मंडळाने गठित केलेल्या ३२(६) समितीच्या अहवालातील निष्कर्ष व शिफारसी दोन्ही परस्पर विरोधी असून समितीने स्वत:च काढलेल्या निष्कर्षांना केराची टोपली दाखवत कुलगुरुंचा अर्मयाद बचाव केला आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थेमधील घटकच कायद्याच्या तरतुदींना पायदळी तुडवीत असल्याचा आरोपीही सूर्यवंशी यांनी केला. कुलगुरुंनी आपल्या मुलीचे गुण वाढविण्यासाठी अधिनस्थ अधिकारी-कर्मचारी व शिक्षक यांचा वापर केल्याचे ३२(६) कमिटीच्या निष्कर्षाहून उघड होत आहे. एकीकडे अध्यादेश क्रमांक ६६/२0१0 चे उल्लंघन झाल्याचा निष्कर्ष काढायचा व दुसरीकडे या उल्लंघनावर आधारित शिफारस करताना ‘हे असे गैर नाही’,असे म्हणायचे असा गैरप्रकार चालविला आहे. घोम यांच्या बयाणात कुलगुरु कन्या त्यांच्या कार्यालयात आली म्हणून मी उत्तर पत्रिका बाहेर काढल्या, असे नमुद आहे. मात्र समिती म्हणते, की हे जरी सत्य असले तरी कुलगुरुंची मुलगी कार्यालयात जाणे म्हणजे दबाव येत नाही व नियमांचे उल्लंघन होत नाही. डुडुल हे मृणाल खेडकर हिचे पी.एच.डी.चे मार्गदर्शक असताना त्यांनी पुनर्मूल्यांकनाची जबाबदारी स्वीकारणे हेच मुळात आक्षेपार्ह वर्तन आहे, असे सूर्यवंशीचे मत आहे. कुलगुरु महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार विद्यापीठावर नियंत्रण ठेवण्यास असर्मथ आहेत. तसेच मुलींच्या उत्तरपत्रिका तपासतात, अनावश्यक व्यावसायिक संबंधाचा वापर करीत असल्याचे ३२(६) च्या अहवालात स्पष्ट होत आहे. त्यामुळे कुलगुरुंना तत्काळ निष्कासित करण्यात यावे, अशी मागणी दिनेश सूर्यवंशी यांनी केली आहे. विद्यार्थी हिताचा, कायद्यातील तरतुदीचा अपमान करणार्यांना आता धडा शिकविणार असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले. यासाठी आंदोलनाची तयारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेमध्ये अनिरुध्द महाजन, तेजस्वी बारब्दे, कोमल राऊत आदींनी विद्यापीठाकडून होणार्या अन्यायाविरोधात लढा देण्याचे ठरविले आहे.
कुलगुरुंना वाचविण्याचा परीक्षा मंडळाचा प्रयत्न
By admin | Published: June 10, 2014 1:06 AM