जितेंद्र कालेकर
ठाणे : लोकमान्यनगर येथील तरसेम सिंग ऊर्फ बॉबी (२५) याचा खून करणाऱ्या शिवम तिवारी, राहुल यादव आणि आकाश निशाद या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने थेट अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथून शनिवारी ताब्यात घेतले. त्यांची ट्रान्सिस्ट कस्टडी घेऊन तिघांनाही सोमवारी ठाण्यात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या खुनातील आरोपींना तातडीने अटक करावी, त्यांना फाशी द्यावी, या मागणीसाठी सावरकरनगर येथील रहिवाशांनी लोकमान्यनगर टीएमटी बस डेपो येथून शनिवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
तत्पूर्वी, या प्रकरणाच्या तपासासाठी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे दोन, तर गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटचे एक अशा तीन पथकांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता.
तिघेही आरोपी लोकमान्यनगरच्या मामाभाचे डोंगरात पळाल्याची शक्यता लक्षात घेऊन खून झाला, त्याच दिवशी ६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते पहाटे उशिरापर्यंत उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे, हवालदार एस.टी. राठोड, नाईक दिलीप शिंदे आदींनी शोध घेतला होता. मात्र, हे त्रिकूट तिथून पसार झाले होते.
तिघेही उत्तर प्रदेशात पळाल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बेंद्रे, हवालदार एस.सी. गोरे, नाईक राजेंद्र गायकवाड आणि दिलीप शिंदे आदींनी त्यांना ११ नोव्हेंबर रोजी अलाहाबाद रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले.
त्यांना रविवारी अलाहाबाद न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांची अलाहाबाद ते ठाणे नेण्याची रीतसर परवानगी न्यायालयातून ठाणे पोलिसांनी घेतली. या तिघांनाही सोमवारी वर्तकनगर पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नावातील गोंधळामुळे खून...तरसेम सिंग ऊर्फ बॉबी याच्या मैत्रिणीला शिवमने सांगितले की, तू बाबूबरोबर फिरत जाऊ नकोस. तिने बाबूऐवजी बॉबी ऐकले. शिवमने आपल्याला तुझ्याबरोबर फिरू नकोस, असे सांगितल्याचे तिने बॉबीला सांगितले.
याचा जाब विचारण्यासाठी बॉबीने शिवमला बरेच कॉल केले. अनेक मिसकॉल पाहिल्यानंतर शिवमने त्याला फोन केला. तेव्हा शिवमने त्याला सांगितले, मी बॉबी नाही तर बाबू म्हणालो. हवे तर मी तुला प्रत्यक्ष भेटून हे सांगतो. त्यानुसार, ते सावरकरनगर येथील ज्ञानोदय शाळेजवळ भेटले.
बॉबी येताना त्याच्या काही मित्रांना हाणामारी करण्यासाठी घेऊन येईल, अशी भीती शिवमला होती. त्यामुळे शिवम काही मित्रांसह तसेच हत्यार बरोबर घेऊनच गेला. तिथे त्यांच्यात झालेल्या बाचाबाचीनंतर शिवमने थेट बॉबी आणि त्याचा साथीदार अजय सिंग याच्यावर छोट्या तलवारीने पोटावर वार केला.
यात बॉबीचा मात्र मृत्यू झाला. हल्ल्यानंतर पसार झालेल्या शिवमसह तिघांनाही उपनिरीक्षक बेंद्रे यांच्या पथकाने आता अटक केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.