ऑनलाइन लोकमत
परभणी, दि. 9 - धार रोड येथील डंपिंग ग्राऊंडमध्ये जळालेल्या अवस्थेतील एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृतदेह पूर्णत: जळालेला असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
9 फेब्रुवारी रोजी एक घंटागाडी चालक कचरा घेऊन या परिसरात दाखल झाला. त्यावेळी त्याला हा मृतदेह दिसला. त्याने तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तराव वाळके, नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्यासह पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.
डम्पिंग ग्राऊंडच्या परिसरातच मृतदेह घेऊन जात असताना वाटेत रक्त सांडलेले पोलिसांना दिसून आले. त्यामुळे कुणी तरी हत्या करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने या भागात मृतदेह जाळला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी सांगितले की, मृतदेहाच्या डोक्यावर, गळ्यावर, मानेवर गंभीर वार केल्याचे दिसले.
मृतदेह जवळपास 100 टक्के जळालेला असल्याने ओळख पटली नाही. दरम्यान मृतदेहाच्या हातात धातूची अंगठी असून, त्यावर वाघाचे चिन्ह आहे. प्रथमदर्शनी हा खून करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रकार असल्याचे दिसते. त्यामुळे सय्यद फरान सय्यद इसाक यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात खून करुन पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.