पोलादपूर : तालुक्यातील घागरकोंड येथील झुलत्या पुलावर ७ सप्टेंबर रोजी फिरण्यासाठी गेलेल्या १३ जणांच्या ग्रुपमधील हर्ष मुरडे (१४, रा. केवनाळे) याचा तोल जाऊन नदी पडून तो प्रवाहात वाहून गेला होता. या दुर्दैवी घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ, पोलीस व कोलाड येथील वॉईल्डर वेस्ट अॅडव्हेंचर टीमने २ पाणबुडे खलासी पाठवून पाच दिवस शोधमोहीम राबविली होती. मात्र हर्षचा मृतदेह हाती लागला नव्हता. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते. रविवार सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अंधारी, सावित्री नदीच्या पात्रात वाकण गावच्या हद्दीत किनाऱ्यालगत हर्ष मुरडे याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला.पोलादपूर पोलिसांना याबाबतची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक अनिल अंधारे, पीएसआय मिंडे, एएसआय मोकल, महाडिक, पार्टे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. गेले दोन दिवस पोलादपुरात पावसाची संततधार सुरू असल्याने कामथी, सावित्री, गांधारी, देवळी नद्या दुथडी भरून वाहत असल्याने कडे कपारीत अडकलेला हर्ष मरडे याचा मृतदेह पाण्याच्या प्रवाहाबरोबर बाहेर आला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अखेर हर्षचा मृतदेह आढळून आल्याने केवनाळे, देवळे सह परिसरात ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (वार्ताहर)
बुडालेल्या हर्ष मुरडेचा मृतदेह सापडला
By admin | Published: September 19, 2016 2:49 AM