कऱ्हाड (जि. सातारा) : विद्यानगर-सैदापूर येथून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या स्वराली वैभव पाटील या चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी त्याच अपार्टमेंटच्या ड्रेनेजमध्ये आढळून आला. स्वरालीचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक वैद्यकीय अहवाल पोलिसांना मिळाला आहे. तसेच तिच्या शरीरावर कसलेही व्रण नाहीत. त्यामुळे खेळताना ती या ड्रेनेजमध्ये पडली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कऱ्हाड येथील विद्यानगर-सैदापूर येथील ‘ज्ञानगंगा अपार्टमेंट’मध्ये डॉ. वैभव पाटील हे कुटुंबासह राहण्यास आहेत. बुधवारी त्यांची मुलगी स्वराली अपार्टमेंटखालील वाळूत खेळत बसली होती, यावेळी तिची आई घरकामात व्यस्त होती. दुपारी एकच्या सुमारास आईने स्वरालीला हाक मारली. मात्र, कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. खाली जाऊन पाहिल्यानंतरही स्वराली कोठेच आढळून आली नाही. पाटील कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनीही तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. दरम्यानच्या कालावधीत स्वरालीचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानुसार डॉ. वैभव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कऱ्हाड शहर पोलिसांत अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद करून शोध सुरू केला. बुधवारपासून पोलिसांनी परिसर पिंजून काढला होता. शुक्रवारी सकाळी पोलिस तपास पथकाने स्वराली जेथून गायब झाली त्याच ठिकाणाहून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. यावेळी अपार्टमेंटच्या पाठीमागील बाजूस असलेल्या ड्रेनेजमध्ये स्वरालीचा मृतदेह आढळून आला.
बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह ड्रेनेजमध्ये आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 3:26 AM