कर्जत : तालुक्यातील भिवपुरी रोड स्टेशनजवळ असलेल्या पाली-भुतिवली धरणामध्ये, मुंबई येथील एक महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्यात बुडाला होता. त्याच्याबरोबर असलेल्या अन्य तीन तरु णांना मात्र बुडण्यापासून वाचविण्यात यश आले होते. शनिवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली होती. नेरळ पोलिसांच्या मदतीने बुडालेल्या विद्यार्थ्याची शोधमोहीम सुरू होती. अखेर रविवारी त्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाली-भुतिवली धरणात आढळला. या पूर्वी चार तरु णांचा या धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, ही पाचवी घटना आहे.तो बुडाल्याची माहिती मिळताच, नेरळ पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले होते, परंतु शनिवारी रात्रीपर्यंत बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध लागला नव्हता. मुंबई येथील एडीएंट ज्युनिअर महाविद्यालय साकीनाका येथील मयंक हरिशंकर गुप्ता (१७), राघवेंद्र दुबे (१८) त्यांच्यासोबत विद्या निकेतन महाविद्यालय घाटकोपर या महाविद्यालयातील अनित सिंग (१८) आणि मनीष दिनेश सिंग हे चौघे पाली-भुतिवली या धरणावर शनिवारी दुपारी पोहायला आले होते. त्या वेळी पोहताना ही घटना घडली. त्यातील मनीष सिंग हा बुडाला असून, मयंक गुप्ता याच्या पोटात पाणी गेल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्याला नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर त्याला उल्हासनगर येथे हलविण्यात आले. शनिवारी रात्रीपर्यंत मनीषचा शोध सुरू होता. अखेर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह धरणात आढळून आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला. याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. (वार्ताहर)
विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
By admin | Published: March 07, 2016 3:43 AM