मुंबई : नवोदित शरीरसौष्ठवपटूंना आपले कसब दाखवण्यासाठी मोठे व्यासपीठ असलेल्या नवोदित मुंबई श्री स्पर्धेचा थरार १० नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये रंगणार आहे. संध्याकाळी ६ वाजता रंगणाऱ्या या स्पर्धेत सुमारे १९० शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील.मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना (एमएसबीबीएफए) आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने होत असलेल्या या स्पर्धेतून मुंबईला कायम चमकदार खेळाडू मिळतात. यंदा या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंवर एकूण एक लाख रुपयांच्या रोख बक्षिसांचा वर्षाव होणार आहे. एकूण सहा गटांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत बाजी मारणारा खेळाडू ११ हजारांच्या रोख रक्कमेवर कब्जा करेल, अशी माहिती स्पर्धा आयोजकांकडून मिळाली.त्याचप्रमाणे, सध्या तरुणाईमध्ये विशेष क्रेझ असलेल्या फिटनेस फिजीक गटाचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला असल्याने मॉडलिंगासाठी उत्सुक असलेल्या तरुणाईचा मोठा प्रतिसाद यासाठी मिळाला आहे. त्यामुळे या गटातील चुरशीकडेही विशेष लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील एकूण ६ गटातील गटविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. दरम्यान, या स्पर्धेत जिल्हा तसेच राज्य स्तरावरील नवोदित, ज्यूनिअर तसेच सिनिअर गट पदकविजेत्या खेळाडूंना सहभागी होता येणार नसल्याने ही स्पर्धा नवोदितांसाठी आपली छाप पाडण्यास सुवर्णसंधी आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
दादरमध्ये रंगणार शरीरसौष्ठवचा थरार
By admin | Published: November 05, 2016 4:04 AM