अकोला - किडनी तस्करी प्रकरणाच्या तपासादरम्यान दररोज नवनवीन माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. या प्रकरणामध्ये अकोल्यातील रहिवासी देवानंद कोमलकर यांची किडनी दान देण्यासाठी गुजरात व महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या एका छोट्याशा बिल्डा गावात बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले असल्याचे तपासात समोर आले. बिल्डा गाव नंदूरबार जिल्हय़ातील नवापूर तालुक्यात आहे.खदान पोलिसांकडून तपास करण्यात येत असलेल्या किडनी तस्करी प्रकरणामध्ये शांताबाई खरात यांच्या तक्रारीवरून विनोद पवारविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच प्रकरणामध्ये देवानंद कोमलकर यांचीही किडनी काढण्यात आल्याचे समोर आले असून, त्यांची किडनी काढण्यासाठी बनविलेले दस्तऐवज बोगस असल्याचे उघड झाले. हे दस्तऐवज बिल्डा येथे बनविले असून, आरोपी विनोद पवारला घेऊन खदान पोलीस या गावात गेले आहेत. कोमलकर यांचे रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला व ओळखीचे प्रमाणपत्र नंदूरबारमध्ये बनविण्यात आले. देवानंद कोमलकरच नव्हे, तर त्यांच्या मुलाचेही शाळेचे दस्तऐवज या ठिकाणी बनविण्यात आले आहेत. त्यांच्या मुलाचे बोनाफाइड सर्टिफिकेट बनवून ते किडनी दान प्रक्रियेसाठी वापरण्यात आले. त्यामुळे खदान पोलीस आरोपी विनोद पवारला घेऊन बिल्डा या गावात गेले असून, येथून नंदूरबारमध्ये ते बोगस दस्तऐवज तयार करणार्याचा शोध घेत आहेत. विनोद पवारच्या आणखी काही साथीदारांना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार असून, यामध्ये डॉक्टर, बोगस दस्तऐवज बनविणार्यांचा समावेश आहे. पवारच्या पोलीस कोठडीत वाढआरोपी विनोद पवारची पोलीस कोठडी संपल्याने त्याला प्रथम श्रेणी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी पवारला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी केली; मात्र विरोधी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे खदानचे ठाणेदार छगनराव इंगळे यांनी व अँड. जी. एल. इंगोले यांनी कामकाज पाहिले.किडनी तस्करी प्रकरणाच्या कलमामध्ये वाढकिडनी तस्करी प्रकरणामध्ये जुने शहर पोलीस ठाण्यात शांताबाई खरात यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद पवार व त्याच्या सहकार्यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४१७ व ४२0 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र खदान पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणातील गुंतागुंत व बनावट दस्तऐवजांचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे जुने शहर पोलीस ठाण्यात या कलमांमध्ये भारतीय दंड विधानाच्या कलम ४६८, ४६५ आणि ४७१ नुसार गुन्हय़ात वाढ करण्यात आली आहे. नंदूरबारमध्ये बनविण्यात आलेले दस्तऐवज बोगस असल्याचे आढळल्याने कलमांमध्ये वाढ करण्यात आली आहे.सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन पोलीस मुंबईतकिडनी तस्करी प्रकरणाचा सूत्रधार शिवाजी कोळी याला घेऊन तपास पथक मुंबईतील वाशी येथे गेले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोळी याला घेऊन आधी नागपूर, यवतमाळ गेले होते. त्यानंतर कोळीला सांगली जिल्हय़ात नेण्यात आले. सांगलीमध्ये मिळालेल्या माहितीवरून कोळीला मुंबईतील वाशी येथे नेण्यात आले. सोमवारी कोळीची पोलीस कोठडी संपणार होती, त्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर करणेही आवश्यक होते. मात्र, तो मुंबईत असल्याने त्याला नजीकच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या ठिकाणी त्याची पोलीस कोठडी आणखी २४ तासांसाठी वाढविण्यात आली.
गुजरात-महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात बनविले बोगस दस्तऐवज!
By admin | Published: December 15, 2015 1:58 AM