मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. वयाच्या 79व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. कोकिळाबेन रुग्णालयात उपचारादरम्यान आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून ते आजारी असल्यानं कोकिळाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही तीन मुलं आहेत. शशी कपूर यांना 2014ला फुप्फुसामध्ये जंतुसंसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत राहिली. शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. शशी कपूर यांनी आतापर्यंत 160 चित्रपटांत काम केलंय. त्यात 148 हिंदी आणि 12 इंग्रजी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांचा जन्म 18 मार्च 1938मध्ये कोलकातामध्ये झाला होता. 60 आणि 70च्या दशकात जब जब फूल खिले, कन्यादान, शर्मिली, आ गले लग जा, रोटी कपडा और मकान, चोर मचाए शोर, दीवार, फकिरा यांसारखे त्यांचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाले. शशी कपूर यांनी आजवर दीवार, सत्यम शिवम सुंदरम, कभी कभी यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण नव्वदीच्या दशकापासून त्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे कमी केले होते.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 6:08 PM