प्रज्ञा म्हात्रे।ठाणे : गरब्यात दरवर्षी नवनवे प्रयोग केले जातात. यंदा गरबाप्रेमी थिरकणार आहेत बॉलीवूड गीतांवर. मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. ती क्रेझ आता कमी झाली असून गुजरातच्या पारंपरिक गरब्याला बॉलीवूडचा तडका दिला जाणार आहे. यासाठी सिझनल गरबा क्लासेसमध्ये गरबाप्रेमींचा जोशपूर्ण वातावरणात सराव सुरू आहे.नवरात्रोत्सव जवळ आल्याने सरावाला जोर चढला आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सारे हौसेने सरावात सहभागी होत आहेत. यात महिलांचा उत्साह मोठा आहे. काळानुसार आम्ही गरब्यात नवनवे प्रयोग करतो. यंदा मूळ गरब्याला बॉलीवूडची जोड दिल्याने वेगळा फॉर्म्स नवरात्रीत पाहायला मिळेल, असे नृत्यदिग्दर्शिका दीप्ती वोरा यांनी सांगितले. तिमली गुजराती, मॉडर्न तडका विथ फ्युजन, रास गरबा विथ काला चष्मा असे वेगवेगळे प्रकार त्या विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. तिमली गुजराती हा पारंपरिक गरबा असून २० स्टेप्सपासून १०० स्टेप्सपर्यंत तो खेळला जातो. बॉलीवूड स्टेप्स आणि पारंपरिक गरब्याचा मेळ मॉडर्न तडका विथ फ्युजनमध्ये आहे. २० स्टेप्सपासून सुरू होणारा गरबा हा ७० स्टेप्सपर्यंत खेळता येतो. ‘उडी उडी जाए दिलकी पतंग’ या गाण्यावर या गरब्याचा तर ‘गोरी राधा ने काडो कान’ या गाण्यावर गुजरातचा दोडियो विथ साल्साचा सराव सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.लहान मुलांना मोठ्यांप्रमाणे परफेक्ट गरबा खेळायचा असतो. त्यामुळे तेही क्लासेसमध्ये सराव करतात. त्यांना खास पलटा सर्कल शिकविण्यात आले आहे. सर्वसाधारण चार स्टेप्सचा काठियावाडी हुडो यंदा १७ ते २० स्टेप्समध्ये सेट करण्यात आला आहे. या बॉलीवूड तडक्याच्या गरब्यात आगळावेगळा प्रकार दिसेल तो पारंपरिक रास विथ काला चष्मा. घागर, बासरी आणि काला चष्मा हे प्रॉप्स या प्रकारात वापरले जाणार आहे. काला चष्मा घालून हा गरबा खेळला जाणार आहे.>धोतीवर गॉगलपारंपरिक पेहरावात खाली धोती आणि कमरेला रुमाल, टॉपवर जॅकेट आणि डोक्यावर मुर्गा टोपी किंवा पगडी आणि सोबत गॉगल अशी हटके वेशभूषा पाहायला मिळेल.>मुलींचा वाढतोय कलगरबा क्लासेसमध्ये येणाºयांमध्ये मुलींची-महिलांची संख्या अधिक आहे. वर्षभर कधीही नृत्याकडे न पाहणाºया महिला गरबा खेळण्यास उत्सुक असतात. यात ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांचा जास्त समावेश असून महिलांचे ग्रूपही शिकण्यासाठी येतात, असे दीप्ती यांनी सांगितले.मध्यंतरी वेस्टर्न गरब्याची चलती होती, पण लोकांना तोचतोचपणा नको आहे. त्यामुळे काळानुसार गरब्यात आम्ही नवे प्रयोग करतो. लोकांनाही पारंपरिक गरबा जास्त आवडू लागला आहे. त्यामुळे या पारंपरिकतेला आम्ही बॉलीवूडचा तडका दिला आहे.- दीप्ती वोरा, नृत्यदिग्दर्शिका
पारंपरिक गरब्याला बॉलिवूडचा तडका, गरबाप्रेमी थिरकणार बॉलिवूड गीतांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 3:42 AM