मुंबई : आमच्या सरकारला ज्या गतीने आणि उत्साहाने काम करायचे होते ते प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या नकारात्मक आणि उदासीन वृत्तीमुळे साध्य करता आले नाही, अशी खंत ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केली. त्या मंत्रालयात पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करीत होत्या. ‘अधिकारी ऐकत नाहीत’ अशी तक्रार काही काळापूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असलेल्या पंकजा यांनीही प्रशासनाविषयी नाराजीचा सूर लावला. त्या म्हणाल्या की, विकासाचा अजेंडा राबविण्यामध्ये प्रशासनाचा नकारात्मक दृष्टिकोन हा अडथळा ठरत आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात दुष्काळाचे आव्हान होते. त्यासाठी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेसाठी सरकार म्हणून आपण स्वत: खूप काही काम करण्याची धडपड केली. मात्र, अनेकदा मंत्रालयापासून तालुका पातळीवर ज्या गतीने प्रशासनाने उत्साहाने कामे करायला हवी होते, त्या गतीने ती झालीच नाहीत, अशी खंत अशी खंतही व्यक्त केली.राज्यात गेल्या दोन वर्षात सरकारने चांगली कामे केली. मात्र काही दिवसांपासून जातीपातीच्या मुद्यावर नेत्यांची आणि एकूणच समाजाची जी वर्गवारी केली जात आहे, ती योग्य नाही, असे त्या म्हणाल्या. जातपात ही मनातून हद्दपार केली पाहिजे, कारण जन्म कोणत्या जातीत हवा याची जन्माआधी निवड करण्याचा पर्याय कोणालाच उपलब्ध नसतो. त्यामुळे जातीय सलोखा कायम राहील याची काळजी समाजात घेतली गेली पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी) >सरपंचांची थेट निवडसरपंचांची निवडणूक थेट जनतेतून घेण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाच्या विचाराधीन आहे. दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये ती पद्धत आहे आणि आपला विभाग तिचा अभ्यास करीत आहे, असे त्यांनी एका प्रश्नात स्पष्ट केले. कुपोषणाच्या प्रश्नावर आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून बालमृत्यूच्या प्रश्नावर अनेक स्तरावर उपाय योजना करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे, असे त्या म्हणाल्या.
नकारात्मक प्रशासनामुळे सरकारच्या गतीला खीळ
By admin | Published: November 04, 2016 5:05 AM