नाशिक : शरणपूर रोडवर बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविण्यात आलेल्या गावठी बॉम्बप्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंटरनेटवरून माहिती घेऊन त्याने गावठी बॉम्ब तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दहशत निर्माण करून खंडणी उकळण्याचा या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा डाव होता, परंतु तो फसला, असे पोलिसांनी सांगितले.महापालिकेच्या राजीव गांधी भवनसमोरील सुयोजित हाईटमध्ये अनंत राजेगावकर या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात बुधवारी दुपारी एका युवकाने पार्सल दिले होते. त्यात गावठी बॉम्ब आढळल्याने खळबळ उडाली होेती. पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने हा बॉम्ब निकामी केल्याने पुढील अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी राजेगावकर यांच्या कार्यालय व परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. तसेच पार्सल राजेगावकर यांनाच उघडू द्या, असे फोनवरून बजावण्यात आले होते. त्या दूरध्वनी क्रमांकाची चौकशी केली आणि त्याच आधारे गुरुवारी दुपारी संशयित महाविद्यालयीन युवकाला ताब्यात घेण्यात आले. हा संशयित मुलगा सधन कुटुंबातील आहे. पैसे मिळविण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे़
बॉम्ब ठेवणारा गजाआड
By admin | Published: February 28, 2015 4:49 AM