मुंबई : गेल्या महिन्यात मुंबईहून बंगळुरूसाठी रवाना होणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा दूरध्वनी अकासा कंपनीच्या कॉल सेंटरला आला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी बंगळुरूचा रहिवासी असलेल्या विलास बकडे याला अटक केली आहे. त्याची पत्नी त्या विमानाने प्रवास करणार होती. मात्र, तिला विमानतळावर पोहोचण्यास विलंब झाल्यामुळे विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तिला प्रवास करण्यास अनुमती नाकारली होती. त्यामुळे वैतागलेल्या पतीने त्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन विमान कंपनीला केल्याची माहिती पुढे आली आहे.
२४ फेब्रुवारी रोजी मुंबईहून बंगळुरूला रवाना होण्यासाठी अकासा कंपनीचे विमान सायंकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी उड्डाण करणार होते. त्या अगोदर जेमतेम चार मिनिटे म्हणजे ६ वाजून ३६ मिनिटांनी अकासा कंपनीच्या मालाड येथील कॉल सेंटरमध्ये एका अज्ञाताने दूरध्वनी करत, त्या विमानात बॉम्ब असल्याचे सांगितले. कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने अकासा कंपनीच्या विमानतळावर तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही माहिती तातडीने उड्डाणाच्या तयारीत असलेल्या संबंधित विमानाच्या वैमानिकाला कळवली. त्याने विमान वाहतूक नियंत्रण (एटीसी) कक्षाशी संपर्क साधला.