बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेने ‘पाणथळ जागा स्थलांतरित पाणपक्षी’ यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून २०१९ सालाचे 'सालिम अली अवॊर्ड फॉर नेचर कॉन्झरवेशन' जाहीर केले आहेत. भारतीय पक्षीशास्त्रात अमूल्य योगदान देणाऱ्या डॉ. सालिम अली यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ बीएनएचएस १९९६ सालापासून हे पुरस्कार जाहीर करीत आहे.
वन्यजीव संशोधन, संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्कार प्रदान सोहळा परिषदेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दि. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी संपन्न होईल.
सालिम अली इंटरनॅशनल अवॊर्ड फॉर नेचर कॉन्झरवेशन, २०१९ - ऍलेक्झांडर लुईस पील
ऍलेक्झांडर पील हे मागील दशकापासून लायबेरिया देशातील जैवविविधता आणि वारसा यांचे रक्षण आणि जतन करण्यामध्ये सक्रिय आहेत. लायबेरियाच्या फुटबॉल संघाचे प्रसिद्ध गोलरक्षक राहिलेले पील यांनी आपली ही सामाजिक प्रतिमा निसर्ग संवर्धनासाठी वापरून देशातील पहिले 'सापो राष्ट्रीय उद्यान आणि देशातील पहिली स्वयंसेवी संस्था 'सोसायटी फॉर द कॉन्झरवेशन ऑफ नेचर ऑफ लायबेरिया' (SCNL) स्थापन केली. पील यांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
सालिम अली नॅशनल अवॊर्ड फॉर नेचर कॉन्झरवेशन, २०१९ - प्रा. माधव गाडगीळ
पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक, आणि स्तंभलेखक म्हणून ओळखले जाणारे पर्यावरण विज्ञान केंद्राचे (Centre for Ecological Sciences) संस्थापक प्रा. माधव गाडगीळ यांनी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांनी पश्चिम घाट परिसंस्था विज्ञान तज्ज्ञांच्या पॅनेलचे अध्यक्षपद भूषविले आहे, जे पुढे गाडगीळ कमिशन म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्यांच्या भारतातील पर्यावरणाच्या संवर्धन कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय विभागातील सालिम अली निसर्ग संवर्धन पुरस्कार, २०१९ प्रा. गाडगीळ यांना प्रदान करण्यात येत आहे.
सालिम अली सामुदायिक अवॊर्ड फॉर नेचर कॉन्झरवेशन, २०१९ - त्सुसेकी आणि लिंथुरे
त्सुसेकी आणि लिंथुरे यांनी नागालँड राज्यातील दुर्गम भागात 'भूतान ग्लोरी इको क्लब'ची स्थापना केली आहे. या इको क्लबच्या वतीने सामुदायिक जमिनीवर वृक्षलागवड मोहीम राबविलया आहेत. या दोघांनी या भागातील वन्यजीवांची शिकार रोखन्यासोबतच तेथील समाजामध्ये संवर्धनाची भावना रुजवली व तरुण पिढीस शाश्वत पर्यायांकडे नेले. या त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देत बीएनएचएस सामुदायिक विभागातील सालिम अली निसर्ग संवर्धन पुरस्काराने त्सुसेकी आणि लिंथुरे यांना गौरवणार आहे.
नवीन पुरस्कार
या वर्षापासून बीएनएचएसने ‘जे.सी. डॅनिअल कॉन्झरवेशन लीडर अवॊर्ड फॉर यंग मेन अँड वुमेन ’ ची घोषणा केली आहे. निसर्ग संवर्धन क्षेत्रात प्रयत्नशील असणाऱ्या तरुण महिला आणि तरुण पुरुष या दोन श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येतील. हे दोन्ही पुरस्कार दिवंगत श्री. जे. सी. डॅनियल यांच्या स्मृतीस समर्पित आहेत. श्री डॅनिअल यांचे नाव उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठी एक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांचे काम अनेक संशोधकांना प्रेरणा देणारे आहे. श्री डॅनियल बीएनएचएस च्या संग्रहालयात सहाय्यक वैज्ञानिक म्हणून सामील झाले होते आणि पुढे ते सोसायटीमध्ये क्युरेटर, संचालक, मानद सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
पुरस्कारप्राप्त विजेत्यांबद्दलः
जे.सी. डॅनिअल कॉन्झरवेशन लीडर अवॊर्ड फॉर यंग मेन, २०१९ - - अनंत पांडे
अनंत पांडे गेल्या दहा वर्षांपासून वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. एक निसर्गप्रेमी म्हणून त्यांचे प्राथमिक संशोधन समुद्रातील अव्वल शिकारी यांचे परिस्थितीशास्त्र आणि संवर्धन, समुद्री पक्षी परिस्थितीशास्त्र, ध्रुवीय परिस्थितीशास्त्र, वातावरणीय बदल, सागरी संरक्षित क्षेत्र व्यवस्थापन आणि संवर्धन शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये आहे. त्यांचे डॉक्टरेटसाठीचे संशोधन वातावरणावर अवलंबून असलेल्या 'स्नो पेट्रेल' या आर्क्टिक समुद्री पक्ष्यावर आहे. या संदर्भातील ही भारतातील प्रथम डॉक्टरेट पदवी होती. एक प्रशिक्षित जीवशास्त्रज्ञ म्हणून त्यानी झुप्लांकटोन, समुद्री पक्षी, डुगॉन्ग्स आणि देवमासा या प्राण्यांवर देखील काम केले आहे. हा पुरस्कार प्रदान करून बीएनएचएस त्यांच्या कामास प्रोत्साहन देत आहे.
जे.सी. डॅनिअल कॉन्झरवेशन लीडर अवॊर्ड फॉर यंग वुमेन, २०१९ - सोनाली गर्ग
सोनाली गर्गने पश्चिम घाट व श्रीलंकेतील बेडकांवर सखोल संशोधन केले आहे. तिच्या संशोधन कार्याद्वारे भारतातील सुमारे एक तृतीयांश तर पश्चिम घाटातील अर्ध्याधिक बेडकांची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. बेडकांच्या चाळीस नवीन प्रजाती आणि दोन नवीन जातींची ओळख सिद्ध करण्यात तिचे मोलाचे योगदान आहे. या तिच्या अमूल्य योगदानाबद्दल बीएनएचएस जे.सी. डॅनिअल कॉन्झरवेशन लीडर अवॊर्ड फॉर यंग वुमेन हा पुरस्कार सोनाली गर्गला प्रदान करत आहे. सर्व विजेत्यांना मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोखरक्कम देऊन गौरवण्यात येणार आहे.