ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. 28 - शेतक-यांच्या शिवारातील मालाला अगदी कमी किंमत तर त्याच शेतमालासाठी ग्राहकांकडून चढया किंमती घेतल्या जातात. चार पैसे मिळविण्यासाठी शेतीमाल शेतक-यांनी बाजार समितीच्या बाहेर विकल्यास माथाडी संपाचा इशारा देतात. त्यामुळे केवळ शेतक-यांचे मरण होते. शेतक-यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर शेतमालावर पोसलेली ही बांडगूळी व्यवस्था बदलाय हवी. मात्र ती बदलली जात नाही. मग शेतक-यांना न्याय कसा मिळणार, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
लहू काळे यांच्या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शेट्टी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश बालवडकर, बाबू गंजेवार, नगरसेवक अॅड. अभय छाजेड, व्यंगचित्रकार चारुहास पंडीत, लहू काळे आदी उपस्थित होते.
ग्राहक आणि व्यापा-यांना खुश करण्यासाठी दुबळ्या शेतक-यांचा बळी देण्याची मानसिकता राज्यकर्त्यांची झाली आहे. शेतीमाल खरेदी करताना सर्वच लोक घासाघीस करतात. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, राज्यकर्त्यांना काय बोलणार असंही राजू शेट्टी बोलले आहेत.
बाटलीबंद पाणी, शितपेय, चॉकलेट यांसारख्या गोष्टींना वाटेल ती किंमत मोजली जाते. सर्वांना फक्त शेतीमालच स्वस्त हवा असतो. शेतीमाल पिकविण्यासाठी शेतक-यांना किती खर्च येतो, किती कष्ट करावे लागतात, याचा विचार कोणी करत नाही. समाजाचीच मानसिकता शेतक-यांना लुटण्याची झाल्याने, सरकारला बोलून काय फायदा आहे. शेतक-यांच्या या परिस्थितीला फक्त त्यांचे नशिबच जबाबदार धरुन चालणार नाही, आपण सर्वच जण त्यासाठी जबाबदार आहोत, असे परखड मत शेट्टी यांनी व्यक्त केले.