नागपूर : शालेय शिक्षणापासून ते उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागात यापुढे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचे स्वागत करीत असताना बुके (पुष्पगुच्छ) ऐवजी बुक (पुस्तक) देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात एक अध्यादेशसुद्धा जारी करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. धनंजय गाडगीळ यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, स्वागतात बुकेच्या ऐवजी बुक स्वीकारणे सुरू केल्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्याजवनळ तब्बल ३००च्या जवळपास पुस्तके जमा झाली आहेत. अधिवेशन संपल्यावर ही पुस्तके ते येथील वाचनालयाला देऊन जातील. वाचनाला प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने डॉ. कलाम यांची जयंती १५ आॅक्टोबर रोजी वाचन दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शाळांमध्ये वाचन कट्टा स्थापन केले जातील. पुस्तक वाचणे आणि पुस्तक देण्याची सवय विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातील. लेखक आणि कवींना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले जाईल. जयप्रकाश मुंधडा यांच्या प्रश्नावर तावडे यांनी सांगितले की, राज्यातील शालेय अभ्यासक्रम ठरविण्यासाठी समिती आहे. डॉ. कलाम यांच्या जीवनावरील एखादा विषय अभ्यासक्रमात सामील करण्यासाठी शिफारस केली जाईल. वाचनालयाच्या अनुदानावर शासन विचार करेल असेही त्यांनी सांगितले. मोबाईल वाचनालयाची संकल्पना भाजपचे आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, शासन मोबाईल वाचनालय सुरू करण्याबाबत विचार करीत आहे. अगोदर मुंबईमध्ये त्यांनी ही सुविधा सुरू करण्याची घोषणा केली. परंतु सदस्यांच्या आग्रहामुळे त्यांनी राज्यातील इतर भागांमध्ये सुद्धा यावर विचार करण्याचे आश्वासन दिले. अबुल कलाम आझाद जयंती ‘शिक्षण दिन’ राज्य शासनातर्फे अबुल कलाम आझाद यांची जयंती ही शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते पुढेही ती तशीच सुरू राहील. महापुरुषांच्या यादीतून अबुल कलाम यांचे नाव हटविण्यात आले का? असा प्रश्न अबु आझमी यांनी विचारला असता याची चौकशी केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.
बुके नाही बुक
By admin | Published: December 18, 2015 2:36 AM