ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांच्यावर बुकर विजेते लेखक सलमान रश्दी यांनी ट्विटरवरुन आक्षेपार्ह शब्दात टीका केली आहे. नेमाडेंसारख्या वृद्ध लेखकाने गुपचूप पुरस्कार स्वीकारुन सर्वांचे आभार मानावे असे रश्दींनी म्हटले असून रश्दींच्या या ट्विटवर जोरदार टीका सुरु झाली आहे.
इंग्रजी ही मारक असून भारताच्या शिक्षण क्षेत्रात इंग्रजी भाषेवर बंदी टाकायला हवी अशी मागणी भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यावर केली होती. या भाषणात नेमाडेंनी भारतीय वंशाचे लेखक सलमान रश्दी आणि व्ही. एस. नायपॉल यांना खोचक टोलाही लगावला होता. हे दोघेही इंग्रजीत साहित्यामध्ये फारसे योगदान नाही असे नेमाडेंनी म्हटले होते. नेमाडेंची ही टीका सलमान रश्दींना चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते. रविवारी रश्दींनी ट्विटरद्वारे नेमाडेंवर टीका केली. नेमाडे यांचा वृद्ध लेखक असा उल्लेखही त्यांनी केला. सलमान रश्दींच्या या ट्विटवर नेमाडेंनी अद्याप उत्तर दिले नसले तरी नेटीझन्सनी सलमान रश्दींनी चांगलेच धारेवर धरले आहे.