जान्हवी मोर्ये,
कल्याण- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या तमीळ माध्यमाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शाळेतील विद्यार्थी यंदा प्रचंड खूष आहेत कारण तब्बल ३५ वर्षांनंतर त्यांच्या हातात कोरी पुस्तके पडली आहेत. १९८० सालापासून मोहने परिसरात सुरु झालेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्यांनी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पुस्तकांच्या झेरॉक्स काढून धडे गिरवले.मोहने परिसरातील एनआरसी कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे कारण पुढे करीत व्यवस्थापनाने कंपनीला नोव्हेंबर २००९ टाळे ठोकले. या कंपनीत पोटापाण्यानिमित्त आलेल्या परप्रांतीय कामगारांची वस्ती मोहने स्टेशन परिसरात तिपन्नानगर म्हणून वसली. या वस्तीतील तमीळ भाषिक मुलांसाठी महापालिकेने १९८० साली शाळा सुरु केली. आज या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात ११९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण कमी आहे. या विद्यार्थ्यासाठी तमीळ भाषेतून एक-दोन वर्षे नव्हे तर तब्बल ३५ वर्षे पुस्तके उपलब्ध होत नव्हती. मात्र मुलांची शिकण्याची आणि शिक्षकांची शिकविण्याची जिद्द मोठी होती. शिक्षक मुंबई महापालिकेतून तमिळ माध्यमाच्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती काढून विद्यार्थ्याना धडे देत होते. यंदाच्या वर्षी शिक्षण मंडळाने प्रथमच या विद्यार्थ्यांना कोरी पुस्तके उपलब्ध करुन दिली आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातील सहाय्यक अधिकारी अर्चना जाधव यांनी दिली. पुस्तके उपलब्ध करुन दिल्याचे आम्हाला समाधान आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका राणी महेंद्रन यांनी सांगितले की, आम्हाला पुस्तके प्राप्त झाली याचा खूप आनंद झाला आहे. झेरॉक्स प्रतींवर शिकवताना त्या जपून ठेवण्याची काळजी घ्यावी लागत होती. विद्यार्थ्याना पुस्तके मिळत नसल्याने त्यांना घरी जाऊन गृहपाठ करता येत नव्हता. त्यांची सगळी मदार झेरॉक्स कॉपीवर होती. त्यामुळे दोन-तीन वर्षापासून मुंबई महापालिकेकडून पुस्तकांची एक प्रत घेऊन त्यावर विद्यार्थी अभ्यास करीत होते.कोऱ्या पुस्तकांचा वास घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद आम्हा शिक्षकांनाही सुखावून गेला आहे.।विद्यार्थ्यांना झाले पुस्तक वाटपस्थानिक नगरसेविका नमिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात आली. पहिली, दुसरी, तिसरी,चौथी आणि सातवीची सर्व पुस्तके उपलब्ध झाली आहेत. परंतु पाचवी, सहावी आणि आठवीची काही पुस्तके येणं बाकी आहे. या पुस्तकांच्या छपाईचे काम अजून सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना देण्यात येतील.।मुंबई महापालिकेने दिली पुस्तके कल्याण-डोंबिवली महापालिकेचे प्रभारी शिक्षण अधिकारी जे. जे. तडवी यांनी सांगितले की, पुस्तकांची छपाई ‘बालभारती’कडून केली जाते. मात्र मुंबई महापालिकेने केलेल्या सहकार्यामुळे या विद्यार्थ्यांना पुस्तके देणे शक्य झाले आहे. मुंबई महापालिकेला शुल्क देऊन पुस्तकांची छपाई करून घेतली आहे.