मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राज्यात सुमारे ६५ लाख तर मुंबईत जवळपास ४ लाख लाभार्थ्यांनी मोफत बूस्टर डोस घेतला. मात्र या मोहिमेनंतर राज्यासह मुंबईतील बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. नुकतेच कोविशिल्डचे लाखो डोस वाया गेले. मात्र सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढत्या संसर्गापासून खबरदारी म्हणून लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केल्या आहेत.
राज्याचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले, लसीकरण मंदावले आहे. मात्र, दिवाळीमुळे सार्वजनिक ठिकाणी वाढलेली गर्दी कोरोनाचे केंद्र ठरु शकते हा मोठा धोका आहे. त्यामुळे संसर्गातील चढ उतार लक्षात घेऊन लसीकरण पूर्ण करण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा. राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. राहुल पंडित यांनी सामान्यांनी लसीकरणाविषयी उदासीनता न दाखविता बूस्टर डोसला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले.
मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या वाढली आहे. कोरोनाच्या नव्या एक्सबीबी ओमायक्रॉन बीक्यू १ या सब व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कोविड रुग्णांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सणांमध्ये कोविड नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि गर्दी यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.