- जमीर काझी, मुंबईकार्यक्षम महिला आयपीएस अधिकारी म्हणून ख्याती असलेल्या महासंचालक मीरा बोरवणकर यांची रेल्वे संरक्षण दलाच्या महासंचालक (डीजी आरपीएफ) म्हणून प्रतिनियुक्ती होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. नियुक्ती झाल्यास त्या रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक ठरतील.‘आरपीएफ’चे सध्याचे प्रमुख राजीव राजन वर्मा सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी बोरवणकर यांच्या प्रतिनियुक्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे, असे अतिवरिष्ठ सूत्रांनी सांगितले. बोरवणकर ३० सप्टेंबरपासून कायदा व तंत्रज्ञ (लीगल व टेक्निकल) विभागात महासंचालक आहेत. त्या १९८१ बॅचच्या अधिकारी असून, पुढील वर्षी ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्या रेल्वे संरक्षण दलात (आरपीएफ) प्रतिनियुक्तीवर जाण्यास इच्छुक आहेत. वर्मा २५ एप्रिल २०१५पासून आरपीएफ महासंचालक आहेत. सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर बोरवणकर यांची निवड निश्चित असल्याचे मानण्यात येते.पदोन्नती का रखडली?पाच महिन्यांपूर्वी अहमद जावेद यांना मुंबईचे आयुक्त बनविण्यासाठी अपर महासंचालकावरून ‘डीजी’चा दर्जा करण्यात आला. डीजींची ६ पदे मंजूर असताना ७ पदे निर्माण झाली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरला संजीव दयाल सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदाचा दर्जा पदावनत करून ‘एडीजी’चा करण्यात आला. ३१ जानेवारीला जावेद निवृत्त झाल्यानंतर ती धुरा १९८२च्या बॅचचे आयपीएस दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सोपविण्यात आली. मात्र त्यांना अद्याप डीजीपदावरती पदोन्नती न दिल्याने ते ‘एडीजी’च आहेत. त्यामुळे एसीबीचे कांबळे निवृत्त व बोरवणकर रेल्वेत गेल्यास पहिल्यांदा पडसलगीकर व त्यानंतर पाठक आणि प्रभातरंजन यांचे प्रमोशन करावे लागणार आहे. निर्णयात विलंब झाल्यास निवृत्तीला केवळ एक महिन्याचा अवधी राहिलेल्या पाठक यांची डीजी बनण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. जावेद यांच्या मुंबईच्या आयुक्तपदाच्या नियुक्तीसाठी त्याबाबतचे सर्व तांत्रिक सोपस्कार काही तासांत पूर्ण करणारा गृहविभाग २६ दिवस उलटूनही पडसलगीकर यांची पदोन्नती का रखडवत आहे? अशी चर्चा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांत सध्या रंगली आहे. त्याबाबत गृह सचिव के. पी. बक्षी यांच्याशी एसएमएसद्वारे संपर्क साधला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदासाठी ‘फिल्डिंग’पुण्याचे पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या जागी नियुक्तीसाठी इच्छुक अधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. सेवाज्येष्ठतेनुसार मुख्यालयातील व्ही. डी. मिश्रा, के. एल. बिष्णोई आदींचा क्रम लागतो. एसआयडीच्या प्रमुख रश्मी शुक्ला, एसीबीचे संजय बर्वे, एस. पी. यादव, एटीएसचे विवेक फणसाळकर, अतुलचंद्र कुलकर्णी आदींची नावे चर्चेत आहेत.
रेल्वे संरक्षण दलाच्या प्रमुखपदी बोरवणकर?
By admin | Published: February 27, 2016 3:00 AM