ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 12- ठाण्यामध्ये 7 जून रोजी एका तेवीस वर्षीय तरूणीवर चालत्या रिक्षेत विनयभंग करून तीला रिक्षेतून बाहेर फेकण्यात आलं होतं. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसंच त्या घटनेतील रिक्षा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नौपाडा पोलिसांनी ही संपूर्ण कारवाई केली. याप्रकरणी पुढचा तपास सुरू झाला आहे. तरुणीचा विनयभंग करणाऱ्याचं रेखाचित्र काही दिवसांपूर्वी नौपाडा पोलिसांनी जारी केलं होतं. त्याआधारे आरोपींचा शोध सुरू होता. तसंच रेखाचित्राशी मिळत्याजुळत्या ४५० रिक्षाचालकांच्या छायाचित्रांची पडताळणी झाली होती. या संपूर्ण चौकशी नंतर नौपाडा पोलिसांना आरोपींना पकडण्यात यश आलं आहे.
प्रकरण नेमकं काय ?
7 जून रोजी ठाण्यातील तीनहात नाका येथून रिक्षात बसलेल्या एका २३ वर्षीय तरुणीवर कापूरबावडीच्या उड्डाणपुलावर चालत्या रिक्षातच लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली होती. या तरुणीने मोठ्या धाडसाने रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदाराला जोरदार प्रतिकार केल्यानंतर तिला चालत्या रिक्षातून बाहेर फेकण्यात आले. या घटनेने स्वप्नाली लाड प्रकरणाची घटना ताजी झाल्याने ठाण्यात एकच खळबळ उडाली होती.
चितळसर-मानपाडा भागात राहणारी तरुणी कामावरून सुटल्यानंतर ७ जून रोजी रात्री ९.३० वा.च्या सुमारास तीनहातनाका येथे रिक्षाची वाट पाहत उभी होती. कासारवडवलीकडे जाणाऱ्या शेअर रिक्षात ती बसली. रिक्षात आधीच खाकी शर्ट घातलेला प्रवासी होता. पातलीपाडा येथे जाणाऱ्या अन्य एका प्रवाशाला नकार देऊन रिक्षा ९.४० वा. निघाली. रिक्षा कॅडबरी उड्डाणपुलावर मधोमध आल्यानंतर आधीच प्रवासी म्हणून बसलेल्याने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अनपेक्षितपणे घडलेल्या या प्रकाराचा तिने तीव्रपणे प्रतिकार केला. तेव्हा, त्याने केलेल्या मारहाणीत तिच्या ओठांना आणि डोळ्यांना मार लागला. तशाही अवस्थेत तिने आरडाओरड करून आपल्या वडिलांना फोन लावला. या झटापटीत फोन रिक्षातच पडला. त्याच वेळी अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याने ‘आता तुला खल्लास करतो, काढ रे सामान,’ अशी धमकीही तिला दिली. दरम्यान, तिने जोरदार प्रतिकार करत आरडाओरड केल्याने रिक्षाचालकाने अखेर ‘सोडून द्या तिला’ असे म्हणत रिक्षाचा वेग काहीसा कमी केला. त्याच वेळी तिच्याशेजारी बसलेल्याने तिला टीसीएस कंपनीच्या गेटजवळ रिक्षाबाहेर ढकलून दिले. तिथे जमलेल्या काही लोकांपैकी एकाच्या मोबाइलवरून तिने ही आपबिती आपल्या घरी कळवली. तिच्या डोक्याला आणि डोळ्याला जबर मार लागला होता. या प्रकरणी अपहरण करणे, विनयभंग, धमकी देणे आदी कलमांखाली नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.