दोन्ही काँग्रेसची बैठक : आघाडीचा चेंडू पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 02:31 AM2018-02-07T02:31:16+5:302018-02-07T02:33:11+5:30
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये मतविभाजन टाळण्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एकमत झाले असले तरी आघाडी करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वावर सोपविण्यात आला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त बैठक विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला खा. अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री
जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. या बैठकीत राजकीय परिस्थिती आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा झाली.
तत्पूर्वी सकाळी काँग्रेसच्या
वरिष्ठ नेत्यांची बैठक टिळक भवन, दादर येथे झाली. बैठकीत सरकारविरोधातील लढय़ाच्या रणनीतीबाबत चर्चा झाली. विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि संविधानाच्या रक्षणासाठी सतत कार्यरत असलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींनाही बैठकीत बोलावण्यात आले होते.
प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याची आर्थिक स्थिती, उद्योग व गुंतवणुकीबाबत सादरीकरण केले. बैठकीस महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह अनेक नेते उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील भाजपा नेते दादासाहेब मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
विद्यमान राजकीय स्थिती, आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा झाली. काही मुद्दय़ांची चर्चा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या स्तरावर होईल. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे.
-अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही पक्षांतील नेत्यांमधील कटुता दूर होऊन गोडवा निर्माण झाला आहे.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी