नागपूर : उपराजधानीत आठ वर्षीय युग चांडक याचे खंडणीसाठी अपहरण करून क्रूरपणे हत्या करणाऱ्या दोन्ही नराधमांना गुरुवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली. नागपूर जिल्हा न्यायालयाच्या अलीकडच्या इतिहासातील दुहेरी फाशीचा हा पहिलाच निर्णय आहे.न्यायालयाने म्हटले की, ‘राजेश धनालाल दवारे (२०) आणि अरविंद अभिलाष सिंग (२४) अशी आरोपींची नावे आहेत. भारतीय दंड विधानातील कलम ‘३६४-अ’चा मूळ उद्देश बालकांचे संरक्षण आणि समाजात सुरक्षितता हा आहे. यात फाशी आणि जन्मठेप या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. एकूणच परिस्थितीजन्य पुराव्यांची छाननी केल्यानंतर असे लक्षात येते की, झटपट श्रीमंत होण्याची तुमची लालसा होती. सुडाच्या भावनेतून क्रूरतेने तुम्ही बालकाची हत्या केली.’ खून व अपहरणाच्या दोन्ही प्रकरणांत वेगवेगळी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.५० साक्षीदार : लकडगंज पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यनारायण जयस्वाल यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून सबळ पुराव्यांसह आरोपींविरुद्ध २७ नोव्हेंबर २०१४ रोजी २९० पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाने ५० साक्षीदार तपासले. उल्लेखनीय बाब म्हणजे एकही साक्षीदार फितूर (होस्टाईल) झाला नाही.निकालानंतर पोलीस प्रचंड गराड्यात आरोपी राजेश दवारे आणि अरविंद सिंग यांना घेऊन जात असतानाच सातव्या मजल्यावरील जिन्याजवळ एका अनोळखी महिलेने मुख्य आरोपी राजेश दवारे याच्या कानशिलात चार-पाच थापडा मारल्या आणि आपला संताप व्यक्त केला.न्यायालय म्हणाले : तुम्ही निष्पाप बालकाची हत्या केल्यानंतर मृतदेह नाल्यात टाकला. बालकाच्या तोंडावर दगड मारला, यात आपली क्रूरता दिसते. असेही स्पष्ट होते की, आपले हे कृत्य पूर्वनियोजित होते. या घटनेमुळे समाजात पसरलेला संताप, घृणा आणि असुरक्षितता लक्षात घेता, तसेच सर्वोच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत दिलेल्या निवाड्यांचा आधार घेता, या न्यायालयाचे असे मत झाले आहे की, कमी वय आणि पहिलाच अपराध या बाबी आपली शिक्षा कमी करण्यासाठी पुरेशा नाहीत, असे न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे.अशी आहे शिक्षा : दोन्ही आरोपींना भारतीय दंड विधानाच्या ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, ३०२ (हत्या) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, १२०-ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत जन्मठेप, १० हजार रुपये दंड, २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगाव्या लागतील. दोसरभवन चौकातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. मुकेश चांडक यांचा आठ वर्षीय मुलगा युग याचे १ सप्टेंबर २०१४ रोजी अपहरण झाले होेते. अपहरणकर्त्यांकडून दोन वेळा खंडणीसाठी फोन करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी दहेगाव-पाटणसावंगी दरम्यानच्या लोणखैरी येथील नाल्यात युगचा गळा दाबून निर्घृण खून केला होता. २ सप्टेंबर रोजी युगचा मृतदेह मिळाला होता. मृतदेह नाल्यात रेती व पालापाचोळ्याने झाकलेलाहोता आणि डोक्यावर मोठा दगड ठेवलेला होता.
दोघांना दुहेरी फाशी
By admin | Published: February 05, 2016 4:06 AM