मीरा रोड : मुलींसमोर मारुन अपमान केल्याचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने बनावट फेसबुक खाते उघडून प्रेमाचे आमिष दाखवत मित्राची हत्या करणाऱ्या दोघांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. हत्येनंतरही आरोपींनी १५ लाखाच्या खंडणीची मागणी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबियांकडे करत होते. बुधवारी दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. जय प्रजापती (२०) हा नवघर येथील डिव्हाईन महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. त्याच्या वडिलांचा स्टीलच्या भांड्यांना बफिंग करण्याचा कारखाना असून एक मोठा भाऊ आहे. भार्इंदरच्याच आरएनपी पार्क भागात राहणारे अजयकुमार विश्वकर्मा (२०) व संजय गौतम (२६) यांच्याशी जयची मैत्री होती. अजय हा फ्लेक्स बनवण्याच्या दुकानात काम करतो तर संजय वाहनचालक आहे. तीन महिन्यांपूर्वी जयने अजयला मित्र-मैत्रिणींसमोर श्रीमुखात भडकवली होती. त्यानंतरही तो या प्रकाराचा सतत उल्लेख करायचा. यामुळे अजयने संजयच्या मदतीने जयचा बदला घेण्याचे ठरवले. दोन महिन्यांपूर्वीअजयने नॅन्सी दिक्षीत नावाच्या मुलीच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडले. या माध्यमातुन तो जयशी गप्पा मारु लागला. अजय मुलीच्या आवाजात जयशी बोलत होता. २७ जुलैला नॅन्सीने नायगाव - जुचंद्र मार्गावर बोलावताच जय भेटण्यासाठी गेला. नॅन्सीची वाट पाहात असताना अजय व संजय तेथे पोहचले. दोघांनी त्याची गळा आवळून व लोखंडी बांबूने मारहाण करुन हत्या केली. मृतदेह चिखलात टाकून दिला. जयशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी नवघर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. २८ जुलैला जयच्या मोबाईलवरुन १५ लाखाची खंडणी देण्याचा मेसेज आला. सुरुवातीला जयचाच खोडसाळपणा वाटला. परंतु जयशी संपर्क होत नसल्याने २९ जुलैला कुटुंबियांनी नवघर पोलीस ठाण्यात खंडणीची तक्रार केली. खंडणीचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शोध सुरु केला. खंडणीची रक्कम घेण्यासाठी जयच्या घरच्यांना विविध ठिकाणी बोलवले. मात्र ते पैसे घेण्यास आले नाही. पोलिसांनी सोमवारी रात्री अजयला रात्री भार्इंदरच्या तलाव मार्ग परिसरातून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने संजयच्या मदतीने जयची हत्या केल्याचे सांगितले. मंगळवारी सकाळी पोलिसांनी जयचा मृतदेह शोधून काढला. दोघेही फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात तरबेज असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मित्राची हत्या करणाऱ्या दोघांना अटक
By admin | Published: August 03, 2016 5:17 AM