मुंबई : गरीब जनतेसाठी असलेल्या रेशनिंग धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दोन आरोपींना वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी गजाआड केले. या आरोपींकडून पोलिसांनी १८० गोणी गहू जप्त केला असून, यामध्ये एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.गेल्या काही दिवसांपासून वडाळा परिसरात धान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांची गस्त सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी एक टेम्पो पोलिसांना संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे आढळले. पोलिसांनी टेम्पोची पाहणी केली असता यामध्ये मोठ्या प्रमाणात गहू असल्याचे आढळले. हा सर्व माल रेशनिंगचा असल्याने पोलिसांनी तत्काळ टेम्पोचालक जयशंकर यादव (२६) आणि क्लिनर अजित यादव (२२) यांना ताब्यात घेतले. या दोघांना वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी या त्यांच्याकडे चौकशी केली.दोन्ही आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शिवाय त्यांच्याकडे या मालाचे बिल नसल्याने पोलिसांनी तत्काळ रेशनिंग कार्यालयाशी संपर्क केला. त्यानुसार रेशनिंग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मालाची पाहणी केली असता सर्व माल रेशनिंगचाच असल्याचे सांगितले. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करीत त्यांना अटक करण्यात आली आहे. १८० गोण्यांसह पोलिसांनी टेम्पोदेखील ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)
रेशनिंगचा काळाबाजार करणारे दोघे अटकेत
By admin | Published: July 04, 2016 5:05 AM