- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्याने निर्माण झालेल्या तणावातून कांदिवलीतील जानुपाडा येथे प्रेमी युगलाने गळफास लावून आत्महत्या केली. कृष्णा लक्ष्मण वरके (वय ३५) व नीलम रामचंद्र भोईर (२१) अशी त्यांची नावे असून दोघेही विवाहित होते. त्यांच्यातील संबंध उघडकीस आल्याने दोन्ही कुटुंबात वाद निर्माण झाला होता, त्यामुळे त्यांनी आदिवासी पाड्यातील कालीमाता मंदिरापासून १०० मीटर अंतरावर जंगलातील झाडाला त्यांनी गळफास लावून घेतल्याचे समतानगर पोलिसांनी सांगितले. कृष्णा वरके हा माळीकाम करीत होता. त्याला दोन मुले असून त्याची पत्नी सारखी आजारी असते. तर नीलम हिचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र पतीशी भांडत असल्याने आठ दिवसांनी ती माहेरी परतली होती. काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोन्हीकडील नातेवाईक व स्थानिकांना ही बाब समजल्याने त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे दोघांनी आयुष्याचा अंत करण्याचे ठरवत शुक्रवारी जंगलात झाडाला गळफास लावून घेतला. रात्री दहाच्या सुमारास एका ग्रामस्थाच्या नजरेस हा प्रकार आल्यानंतर त्याने पोलिसांना याबाबत कळविले.