बालाघाट पोलिसांची कारवाई : नागपूरला विक्रीसाठी जात होतेगोंदिया : मध्य प्रदेशातून नागपूरला वाघाची कातडी विकण्यासाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना कारसह रंगेहाथ पकडण्यात आले. तिरोडा-बालाघाट मार्गावरील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या पुलावर कार अडवून दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) पहाटे मध्य प्रदेशातील बालाघाट पोलिसांनी केली. जप्त केलेली वाघाची कातडी १० लाख रुपये किमतीची असल्याचे समजते. अटक केलेल्या आरोपींमध्ये मधुकर मेघराजानी (४७) रा.लाखनी जि.भंडारा, सुधाकर गोविंदा खटवानी (४०) रा.साकोली जि.भंडारा यांचा समावेश आहे.बालाघाट जिल्ह्यातील नैनपूर येथून दोघे जण अल्टो कारने वाघाची कातडी घेऊन नागपूरकडे निघाले असल्याची माहिती बालाघाट पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर बालाघाट पोलिसांनी संशयित वाहनाचा पाठलाग करून गोंदिया व मध्य प्रदेश सिमेवरील धापेवाडा प्रकल्पाच्या पुलावर ती कार गाठली. कार (एमएच३६/एच-२७४४) अडवून तपासणी केली असता वाघाची कातडी सापडली. कारमध्ये बसलेल्या मधुकर मेघराजानी व सुधाकर खटवानी या दोघांना लगेच ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता ही वाघाची कातडी ते १० लाख रुपयांत विकणार होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली.दोन्ही आरोपींविरुध्द वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक हरिप्रसाद टेकाम यांनी केली. (प्रतिनिधी)
भंडारा जिल्ह्यातील दोघांना वाघाच्या कातडीसह पकडले
By admin | Published: October 19, 2014 12:56 AM