ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 19 - मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर भाताण बोगद्याजवळ इको व्हॅन या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण बाणडोंगरी येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
रुकसाना शाबुद्दिन शेख (वय 30) व ललाबी मोईद्दीन मुजावर (वय 40) अशी मृत पावलेल्या महिलांची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेली इको व्हॅनच्या (गाडी क्रमांक MH 02 NA 825) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व ही गाडी जाऊन रस्त्यालगतच्या झाडाला धडकल्याने हा अपघात झाला. ज्यात दोन महिलांचा मृत्यू झाला. शिवाय गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे.
दरम्यान, सर्व जखमींना पनवेल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.