मुंबई- लोअर परेल भागातल्या कमला मिल कंपाऊंडमधल्या हॉटेल मोजोला आग लागली आणि पाहता पाहता ही आग वा-यासारखी पसरली. आतापर्यंत आगीत गुदमरून 14 जण जिवानिशी गेलेत. त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. धैर्य ललानी हा अमेरिकेत नोकरी करतो. ख्रिसमसच्या सुट्टीनिमित्त तो भारतात आला होता.सुट्टी एन्जॉय करण्यासाठी विश्व ललानी हा भाऊ धैर्य ललानी आणि आत्या प्रमिला केनिया यांना पार्टीनिमित्त सोबत घेऊन हॉटेल वन अबव्हमध्ये गेला आणि काळानं त्यांच्यावर घाला घातला. आग लागल्याचं समजताच विश्व ललानी आणि धैर्य ललानी लागलीच हॉटेलच्या बाहेर आले. परंतु आत त्यांची आत्या प्रमिला केनिया अडकल्याचं समजताच पुन्हा त्यांनी हॉटेल वन अबव्हमध्ये प्रवेश केला. हॉटेलमध्ये कुठलीही खिडकी नसल्यानं दोन्ही भावांना बाहेर पडता आले नाही.इतरांच्या मृतदेहाजवळ या दोन्ही भावांना आत्या प्रमिला या बेशुद्धावस्थेत दिसल्या. आत्याच्या बचावासाठी गेलेला एक भाऊ आगीमुळे वॉशरूममध्ये अडकला. बराच वेळ झाला तरी तो बाहेर न आल्यामुळे दुसरा भाऊ आत शिरला. परंतु तोसुद्धा परतला नाही, असे एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितले. काही वेळानंतर हे दोघे भाऊ आणि त्यांची आत्या हे तिघेही मृतावस्थेत सापडले. तिघांच्या मृत्यूची वार्ता समजताच ललानी कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली. सकाळी या तिघांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर धैर्य आणि विश्व यांचे वडील जयंत ललानी हे निःशब्द झाले.आत्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्या दोन्ही भावांना प्राण गमवावे लागले. महिन्याभराची सुट्टी घालवण्यासाठी अमेरिकेहून मुंबईत आलेल्या धैर्यचा प्रवास हॉटेल वन अबव्हमध्येच संपला. पोलिसांनी हॉटेल वन अबव्ह पबच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस नेमकी आग कशामुळे लागली आहे, याचा शोध घेत आहेत.
#KamalaMillsFire - आत्याला वाचवण्यासाठी गेलेले 'ते' दोघे सापडले मृत्यूच्या दाढेत
By वैभव देसाई | Published: December 29, 2017 7:54 AM