मूर्तिजापूर: भारतीय जनता पक्षाचे येथील माजी नगरसेवक मनोज बंसीलाल शर्मा (३५) यांच्या हत्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांनी बुधवारी रात्री उशिरा दोघांना अटक करून विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, मुख्य आरोपी अजूनही फरार असून, त्यांचा शोध घेणे सुरू आहे. मूर्तिजापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक मनोज बंसीलाल शर्मा यांची बुधवार, ४ जून रोजी रात्री १०.३० वाजताचे सुमारास पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली. शर्मा हे त्यांच्या मित्रांसोबत रात्री अग्रसेन चौकात बसले असताना एका सशस्त्र टोळीने त्यांच्यावर पाईप, गुप्ती, चाकू आदी शस्त्रांनी वार करून त्यांची निघृर्ण हत्या केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राम जोशी यांनाही मारहाण करण्यात आल्याने ते जखमी झाले. शर्मा यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांना प्रथम मूर्तिजापूर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अकोला येथील आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी शर्मा यांना मृत घोषित केले.
घटनेच्या रात्री पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू करून, बबनराव शितोडे, गणेश शितोडे यांना अटक केली. तर मुख्य आरोपी बाळा बबन शितोडे (२५), आशिष बबन शितोडे (२२) आणि इतर पाच ते सात जण अद्यापही फरार आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
**शहरात कडकडीत बंद
या घटनेमुळे मूर्तिजापूर शहरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी शहरातील व्यापार्यांनी त्यांची व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अकोला येथून सीआरपीएफची तुकडी आणि बोरगाव मंजू व माना येथून पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली आहे.