तुमसर (भंडारा), दि. 7 - देवदर्शनाकरिता बाहेरगावी गेलेल्या भाविकांना स्वाईन फ्ल्यू या आजाराची लागण झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना तुमसर तालुक्यातील चांदमारा येथे घडली.
ईश्वरदयाल देशमुख (५०), निलावंती गजानन झोळे (३५) रा.चांदमारा ता.तुमसर जि. भंडारा असे संशयित स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पाच दिवसापूर्वी चांदमारा येथील झोळे व देशमुख कुटुंबिय हे शेगाव व शिर्डी येथे देवदर्शनाला गेले होते. तिथून परत आल्यानंतर ईश्वरदयाल देशमुख व निलावंती झोळे यांना ताप, खोकला, सर्दी आणि श्वास घेण्यासाठी त्रास जाणवत होता. त्यामुळे ईश्वरदयालने तुमसर येथील रूग्णालयात तपासणी केली असता त्यांच्या आजाराची लक्षणे हे स्वाईन फ्ल्यूचे दिसून येताच त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असता एचवनएनवन पॉझिटीव्ह आढळून आले. दरम्यान ५ सप्टेंबर रोजी ईश्वर देशमुख यांचा मृत्यू झाला. त्यामुळे ६ सप्टेंबरला नाकाडोंगरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने चांदमारा येथे शिबिर घेऊन जिल्ह्याबाहेर गेलेल्यांची तपासणी केली. त्यांना उपचारार्थ तुमसर उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले असताना आज ७ सप्टेंबर रोजी निलावंती झोळे या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे या आजाराबाबत चांदमारा व परिसरात धास्ती निर्माण झाली आहे.
ईश्वरदयाल देशमुख यांचा रक्त तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आहे. निलावंती झोळे यांचा अहवाल यायचा आहे. गावात शिबिर लावून संशयितांना तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत.
-डॉ.एम.ए. कुरैशी, तालुका वैद्यकीय अधिकारी तुमसर