शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा प्रवास; ढाल-तलवार, इंजिन अन् धनुष्यबाण लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिवसेनेने एकेकाळी ढाल-तलवार, इंजिन अशा चिन्हांवर सुरुवातीच्या वर्षांमध्ये निवडणुका लढविल्या आणि नंतर घेतलेले धनुष्यबाण हे चिन्ह खऱ्या अर्थाने प्रस्थापित झाले. मात्र, जवळपास साडेतीन दशकांच्या सोबतीनंतर शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह तूर्त गमवावे लागले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यानंतर सुरुवातीला दोन दशकांहून अधिक काळ शिवसेनेचे उमेदवार कधी अपक्ष, तर कधी ढाल-तलवार, इंजिन असे चिन्ह घेऊनही लढले. मात्र, पुढे शिवसेना म्हणजे धनुष्यबाण हे समीकरण दृढ झाले. आज शिवसेनेत असलेल्या दोन्ही गटांना आयोगाने अंतरिम आदेशाद्वारे धनुष्यबाण वापरण्यास मनाई केली आहे. आयोगाच्या अंतिम सुनावणीत काय फैसला येतो, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.
१९६८ च्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी शिवसेनेने एक मिरवणूक काढली, त्यात शिवसैनिक असलेले लहू आचरेकर हे प्रभू श्रीराम बनले, तर ऑर्थर डिसुझा हा कार्यकर्ता लक्ष्मण बनला होता. राम-लक्ष्मणाच्या हाती ताणलेले धनुष्य होते. शिवसेना भविष्यात धनुष्यबाण चिन्ह घेणार, असे संकेत त्यातून देण्यात आले होते अशी आठवण ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी सांगितली. लक्ष्याचा अचूक वेध घेतो तो धनुष्यबाण. शिवसेना पक्ष म्हणून राजकीय वाटचालीत आता असाच अचूक वेध घेणार असल्याचे निदर्शक म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धनुष्यबाण चिन्हाची निवड केली, असे म्हटले जाते.
ठाकरे, शिंदे गटाच्या आज बैठकानिवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपापल्या निकटवर्तीय नेत्यांशी रविवारी चर्चा करणार आहेत. शिंदे यांनी त्यांच्यासोबतच्या १२ खासदारांची स्वतंत्र बैठक बोलविली आहे.
निवडणूक आयोगाच्या निकालाने भाजपला ना आनंद झाला आहे, ना खंत आहे. आता आयोगाच्या निर्णयाआड भाजप असल्याची टीका करणे आणि त्यातून सहानुभूती मिळविणे अत्यंत चुकीचे आहे.- सुधीर मुनगंटीवारवन व सांस्कृतिक मंत्री.
ईडी, सीबीआयनंतर आता निवडणूक आयोग वेठबिगार झाला आहे. छाननीही न करता आम्हाला धनुष्यबाण चिन्ह नाकारण्यात आले. देश हुकूमशाहीकडे चालला आहे.- खा. अरविंद सावंतठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते
आयोगाच्या आजच्या निकालाची अंमलबजावणी अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीपासून होणार आहे, पण आयोगाच्या अंतिम सुनावणीत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळेल, असा विश्वास आहे. - दीपक केसरकरशिक्षणमंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते.