भिवंडी : शहरात अनेक ठिकाणी गटारे व नाल्यांवर झाकणे नसल्याने त्यामध्ये मुले व जनावरे पडण्याच्या घटना घडत आहेत. शुक्रवारी रात्री नाल्यात पडलेला तीन वर्षांचा मुलगा सहा तासांनंतर सापडला. वस्तुस्थितीची नगरसेवक व अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहरातील गुलजारनगर नरी मशिदीच्या बाजूला आपल्या पालकांसमवेत राहणारा मुलगा आयान अख्तर अली (३ वर्षे) शुक्रवारी रात्री साडेआठपासून अचानक गायब झाला. ही बाब परिसरात समजल्यानंतर रात्री १० वाजता तेथील मुलांनी आयान याचा शोध घेण्यास सुरुवात केली. इमारतींच्या गॅलरी व मोहल्यात शोध घेतल्यानंतर रात्री १ वाजता नाले व गटारांतून शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आयानचा काका अर्षद अली खान हा झाकण नसलेल्या नाल्यात उतरला असता नाल्यातील कचरा साठलेल्या ठिकाणी आयान बेशुद्धावस्थेत सापडला. नाल्यातील घुशींनी त्याच्या शरीरावर जखमा केल्या होत्या. आयान याच्या जखमांवर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्याला वडील अख्तर अली यांच्यासोबत घरी सोडले. सुदैवाने नाल्यात प्रवाह नसल्याने मुलाचा शोध घेणे सोपे झाले. यापूर्वी २०१३ मध्ये पावसाळ्यात याच झाकण नसलेल्या नाल्यात पडलेली एक मुलगी वाहून गेली. शांतीनगर भागात गुलजारनगर, वॉर्ड क्र .१९ मध्ये हा नाला असून या नाल्यात दीड वर्षापूर्वी गोणीत बांधलेला मृतदेह सापडला होता. मागील १५ दिवसांत या नाल्याच्या उघड्या झाकणातून दोन मुले पडली होती. त्यांना नागरिकांनी बाहेर काढले. (प्रतिनिधी)>उपायुक्तांकडून घटनास्थळाची पाहणीनगरसेवक अन्वर अली अनिस शेख यांनी दुर्लक्ष केल्याने येथील नागरिकांनी पालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेत उपायुक्त विजया कंठे यांनी घटनास्थळी भेट देऊन उघड्या झाकणाची पाहणी केली. परंतु, अद्याप उपाययोजना न केल्याने भविष्यात परिसरातील नागरिकांच्या जीवास धोेका निर्माण झाला आहे.
नाल्यात पडलेला मुलगा मिळाला...
By admin | Published: June 13, 2016 5:09 AM