अशोक परदेशी / लोकमत न्यूज नेटवर्कभडगाव (जि. जळगाव) : गरीबीमुळे मुलगा व नातवाच्या मदतीने वखर ओढत कपाशीची कोळपणी करणाऱ्या शेतकऱ्याला रतनलाल सी. बाफना यांच्या माध्यमातून नुकतीच ४० हजार रुपयांची बैलजोडी मिळाली आहे. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त दिल्यानंतर कृषी अधिकाऱ्याने त्याची दखल घेतली होती.निंभोरा येथील शेतकरी हिरामण सुखदेव पाटील (७२) यांच्याकडे एक एकर जमीन आहे. बैलजोडीसाठी पैसे कोठून आणावे हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. मुलगा प्रल्हाद व नातू उमेशसह स्वत: वखर ओढून कपाशीची वखरणी, आंतरमशागत, कोळपणीचे काम ते करायचे. त्यामुळे खर्चाची बचत व्हायची. लहानशा शेतात विहीर असून कपाशीला ते ठिबक सिंचनने पाणी देतात.लोकमतने २० जूनच्या अंकात छायाचित्रासह त्यांची व्यथा मांडली होती. कृषी अधिकारी विवेकसोनवणे यांनी ३० जूनला निंभोरा येथे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत कृषी उपसंचालक अनिल भोकरे व इतर कृषी अधिकारीही होते. सोनवणे यांनी शाकाहार- सदाचारचे प्रणेते रतनलाल सी. बाफना यांच्याकडे शेतकऱ्याची कैफीयत मांडली. बाफना यांनी उदार मनाने ४० हजार रुपयांची बैलजोडी शेतकऱ्यास घरपोच दिली. कृषी विभागातर्फे बैलांसाठी एक पोते ढेप देण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने बैलजोडी मिळाली, याबद्दल लोकमत, जिल्हा कृषी विभाग तसेच रतनलाल बाफना यांचे पाटील यांनी आभार मानले आहेत. मी यापूर्वी दोनदा आषाढी पायी वारीत गेलो होतो. यंदा पत्नी मथुराबाई पंढरपूरला गेल्या आहेत. मागील वर्षी पायी वारीत गेल्यावर विहिरीला चांगले पाणी लागले होते. आता दारात पांडुरंगानेच बैलजोडी आणून दिली. आषाढी एकादशीपूर्वी बैलजोडी दारात आल्याचा आनंद आहे. काळी आई माझी पंढरी आहे. - हिरामण पाटील, शेतकरी
मुलगा, नातवासह वखर ओढणाऱ्या बळीराजाला बैलजोडी!
By admin | Published: July 03, 2017 4:27 AM