ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या दोन कार्यक्रमांवर सार्वजनिक बांधकाममंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेने बहिष्कार घातल्याने कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या व आता होऊ घातलेल्या महापौरपदाच्या निवडणुकीतील संघर्ष विकोपाला गेल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.कल्याण-डोंबिवलीत महापौर आपलाच बसवायचा, असा चंग भाजपाने बांधला असून त्याकरिता मनसे, अपक्ष तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांना सोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेला सर्वाधिक जागा प्राप्त होऊनही त्या पक्षाला बाजूला ठेवून सत्तास्थापनेच्या भाजपाच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे शिवसेना दुखावली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे तसेच महापौर संजय मोरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या नूतनीकृत डिजिटल वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अनावरण समारंभावर तसेच काशिनाथ नाट्यगृहात होणाऱ्या मुद्देमाल अभिहस्तांतरण कार्यक्रमावर बहिष्कार घातला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाकडून शिवसैनिकांना हेतुत: त्रास दिला जात असल्याच्या निषेधार्थ शिंदे यांनी भर सभेत मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी तो फेटाळला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकार तडीपार करण्याची भाषा केली होती, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाचा पंजा काय दाखवता, वाघाच्या तोंडात हात घालून दात मोजणारी आमची जात असल्याचा इशारा शिवसेनेला दिला होता. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही शिंदे यांनी अनुपस्थित राहून आपली नाराजी प्रकट केली होती. इंदू मिलच्या भूमिपूजन समारंभाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐनवेळी निमंत्रित केल्यामुळे शिवसेनेने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावरही बहिष्कार घातला होता.पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतच्या कार्यक्रमाला हजर राहू शकलो नाही. कल्याण-डोंबिवली महापौरपदाच्या निवडणुकीशी त्याचा संबंध नाही.- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर सेनेचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2015 2:17 AM