त्र्यंबकेश्वर (नाशिक) : सिंहस्थ पर्वकाळास येत्या १४ जुलैला सुरुवात होत असून, दिवशी ध्वजारोहण झाल्यानंतर आम्ही ध्वजास नमस्कार करून आमच्या आखाड्यांच्या सर्व साधूंना बरोबर घेऊन उज्जैनकडे प्रयाण करू, त्र्यंबक कुंभमेळ्यावर आम्ही बहिष्कार घालणार असल्याचे खळबळजनक वक्तव्य श्रीपंचदशनाम जुना आखाड्याचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरी महाराज यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले. सिंहस्थ कामांविषयी ते नाराज आहेत. त्यांचा सर्व रोष सहायक मेळा अधिकारी महेश पाटील यांच्यावर असून, त्यांच्यामुळेच आमची कामे होऊ शकली नाहीत, असा आरोपही पाटील यांचे नाव घेऊन केला. यावेळी हरिगिरी म्हणाले की, मागील कुंभमेळ्यात मला सहा शेड्स मिळाले होते. यावेळेस फक्त चार शेड्स मिळालेत. मिळालेल्या शेड्सचे कामही निकृष्ट दर्जाचे आहे. या शेड्सला पायाच न घेतल्याने शेड खालून पाणी वाहत आहे. शेडपासून पायऱ्या मोकळ्या झाल्या आहेत. प्रसाधनगृहाचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. ज्या ठिकाणी आमचे तंबू लागणार आहेत. तेथील जमीन पाण्याने ओली होऊन अक्षरश: चिखल झाला असल्याचीही त्यांनी तक्रार केली. (प्रतिनिधी)
प्रशासनाविरोधात कुंभमेळ्यावर बहिष्कार घालणार
By admin | Published: June 28, 2015 2:11 AM