मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने शेतकरी, व्यापारी, मुस्लीम, मराठा, धनगर, मागासवर्गीय यांची गेल्या शंभर दिवसात घोर फसवणूक केली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांपासून घूमजाव करणारे हे सरकार आहे. त्यामुळे या सरकारने आपल्या शंभर दिवसांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढावी ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मागणी विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लावून धरण्यात येणार असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. अशा सरकारचा चहा घेणे म्हणजे जनतेचा अनादर होईल त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचे त्यांनी सांगितले.विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट, एमआयएम, समाजवादी पार्टी, शेकाप, मनसे व लोकभारतीचे कपिल पाटील या सर्वांशी चर्चा करून चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस या सर्वच नैसर्गिक आपत्तींच्यावेळी सरकारने शेतकऱ्यांना मदत न देऊन आपल्या असंवेदनशीलतेचे दर्शन घडवले. आता तर दुष्काळात मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची मदत न देण्याचा फतवा सरकारने काढला आहे. (विशेष प्रतिनिधी)
चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
By admin | Published: March 09, 2015 2:29 AM